मॅंचेस्टर – ख्रिस्तियानो रानोल्डोचे मॅंचेस्टर युनायटेडमधील पुनरागमन निश्चित झाले आहे. रोनाल्डोने युव्हेंटस् क्लबमधून स्थलांतरण प्रक्रिया पूर्ण केल्याच्या वृत्ताला संबंधित क्लबकडून दुजोरा देण्यात आला आहे.
पोर्तुगालचा आक्रमक रोनाल्डोने 2003 ते 2009 या कालावधीत मॅंचेस्टरला आठ महत्त्वाची जेतेपदे जिंकून दिली होती. याबाबत कराराचा आकडा स्पष्ट होऊ शकला नसला, तरी ब्रिटन आणि इटलीच्या प्रसारमाध्यमांनी रोनाल्डोने दोन वर्षांसाठी दोन कोटी, 50 लाख युरोचा करार केल्याचे म्हटले आहे. 2018 मध्ये रोनाल्डोने रेयाल माद्रिदमधून युव्हेंटस् क्लबमध्ये स्थलांतराचा करार केला होता.
माद्रिदचे नऊ वर्षे प्रतिनिधित्व करताना रोनाल्डोने 438 सामन्यांत 450 गोल केले होते. याशिवाय चॅम्पियन्स लीग जेतेपदासह चार महत्त्वाची जेतेपदे पटकावली होती.