Eknath Khadse । तीन दशकाहून जास्त काळ भाजपात राहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आता पुन्हा भाजपाच्या वाटेवर असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. यासंबंधीचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलंय. एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक मानले जातात. देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्ष सोडण्याचा संपूर्ण ठपका ठेवून त्यांनी भाजपाला रामराम केला. परंतु, आता ते पुन्हा भाजपवासी होण्याचा चर्चांना उधाण आलंय.
विविध मुद्द्यांवरून भाजपला सोडचिट्ठी Eknath Khadse ।
एकनाथ खडसे यांनी २३ ऑक्टोबर २०२० रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पक्षांतर्गत वाद, भोसरी भूखंड घोटाळा, देवेंद्र फडणवीसांशी मतभेद आदी विविध मुद्द्यांवरून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. २०२० मध्ये राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना तत्काळ नेतेपदी विराजमान करण्यात आलं. तेव्हापासूनच त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली. बुथवर जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या होत्या. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्याने राजकीय गणिते बदलली. त्यामुळे उमेदवारीचा मोठा पेच निर्माण झाला आहे.
त्यातच रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. तर, महाविकास आघाडीत रावेरची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवरून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. एकनाथ खडसेंनाच या जागेवरून उमेदवारी मिळाल्यास सून-सासरे असा जंगी सामना रंगण्याची शक्यता होती. परंतु, या जागेवरून तीन ते चार उमेदवार इच्छुक असल्याचं एकनाथ खडसेंनीच स्पष्ट केलं होतं.
सूनेविरोधात लढण्यास नकार Eknath Khadse ।
दरम्यान, या काळात एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपात सामील होण्याच्या चर्चांना उधाण आलंय. याच काळात त्यांनी दिल्लीवारी केल्याने या चर्चांना बळ मिळालं. परंतु, आपण भाजपात जाणार असल्याच्या अफवा असल्याचं खडसेंनी वारंवार मान्य केलं. तसंच, या चर्चांना रक्षा खडसे यांनीही पूर्णविराम दिला होता.
परंतु, या चर्चा सुरू असतानाच एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्याचं निश्चित झालंय. एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून सूनेविरोधात लढण्यास नकार दिल्यानंतर ते पुन्हा भाजपात परतणार असल्याचं स्पष्ट झालं आहे, असं या वृत्तात म्हटलंय.