न्युयॉर्क – जागतिक टेनिसमधील स्टार खेळाडू राफेल नदाल व रॉजर फेडरर यांच्या अनुपस्थितीत सोमवारपासून रंगणाऱ्या अमेरिकन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेतही सर्बियाचा नोवाक जोकोवीच यालाच संभाव्य विजेता मानले जात आहे.
केवळ जोकोवीचच नव्हे तर महिला गटात ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टी हिला महिला एकेरीत विजेतेपदाची प्रमुख दावेदार मानले जात आहे. या दोन्ही खेळाडूंना स्पर्धेसाठी अग्रमानांकन देण्यात आले आहे.
नदाल व फेडरर या स्पर्धेत खेळणार नसल्याने रशियाच्या डॅनियल मेदवेदेवला दुसरे, तर, ग्रीसच्या स्टोफानोस त्सित्सिपासला तिसरे मानांकन देण्यात आले आहे. यंदा टोकियोत झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्डन ग्रॅंडस्लॅम पूर्ण करण्यात जोकोवीच अपयशी ठरला होता. त्याला या स्पर्धेत ऍलेक्झांडर ज्वेरेवने पराभूत करत सुवर्णपदक जिंकले होते. त्याला या स्पर्धेत चौथे मानांकन आहे. महिलांमध्ये आर्यना सबालेंकाला दुसरे, तर जपानची गतविजेती नाओमी ओसाकाला तिसरे मानांकन देण्यात आले. जागतिक क्रमवारीनुसार यंदा मानांकने देण्यात आले आहे.
प्रेक्षकांना नियमांनूसारच परवानगी
या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली असली तरीही त्यांना करोनाची लस घेतल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. लस घेतलेल्या प्रेक्षकांनाच स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.