नवी दिल्ली – केंद्रीय मंत्र्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या संबंधात एका स्वयंसेवी संस्थेने या मंत्र्यांची एक कुंडली सादर केली आहे. त्यात मोदी सरकारमधील 43 टक्के म्हणजे 33 मंत्र्यावर गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले असून त्यातील 24 मंत्र्यावर हत्या किंवा हत्येचे प्रयत्न अशा सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत असे या संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
एडीआर म्हणजेच असोशिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म या संस्थेच्या वतीने हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे आहे. अलिकडेच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. त्यात 43 मंत्र्यांचा समावेश करण्यात आल्याने मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता 78 झाली आहे.
यातील 43 मंत्र्यांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत असे रेकॉर्डवर उपलब्ध आहे. त्याची माहिती संकलीत करून संबंधीत संस्थेने हा अहवाल तयार केला आहे. या मंत्र्यांनी उमेदवारी अर्जात त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची जी माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे त्यावरूनच हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वात तरूण मंत्री म्हणून निसित प्रामाणिक यांची ओळख आहे. ते 35 वर्षांचे आहेत. त्यांच्याकडे थेट गृह खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असली तरी ते एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत असे या अहवालात नमूद करण्यात आली आहे. या खेरीज जॉन बारला, पंकज चौधरी, व्ही मुरलीधरन या तीन मंत्र्यांच्या विरोधातही खुनाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळातील 78 मंत्र्यांपैकी 70 मंत्री कोट्याधिश असून या मंत्र्यांची सरासरी संपत्ती 16 कोटी 24 लाख इतकी आहे असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.