हिंगोली : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कारला अपघात झाला आहे. वर्षा गायकवाड यांच्या गाडीला एका पिकअप टेम्पोने धडक दिली. सुदैवाने या अपघातात त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. हिंगोलीच्या दौऱ्यावर असलेल्या गायकवाड शनिवारी जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रवाना झाल्या होत्या. शहरातील रामलिला मैदानाची पाहणी करण्यासाठी त्यांचा ताफा शहरात आला होता.
त्याचवेळी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास शहरातील पिपल्स बँकेजवळ एका पिकअप टेम्पोने त्यांच्या ताफ्याला धडक दिली. पण चालकाने प्रसंगावधान राखत कारचा वेग वाढवला, त्यामुळे टेम्पो कारच्या मागील भागाला धक्का देऊन गेला. सुदैवाने या अपघातात कुणालाही इजा झाली नाही.
या अपघातनंतर वर्षा गायकवाड यांचा ताफा काही काळ थांबला होता. त्यानंतर गायकवाड आपल्या नियोजित बैठकीसाठी रवाना झाल्या.