पवनानगर रस्त्यावरील प्रकार : तीन जणांवर गुन्हा दाखल
कामशेत – “दुकानाचे भाडे मागितले आणि दुकान खाली कर असे सांगणाऱ्या एका व्यापाऱ्यास तिघांनी रस्त्यात अडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कामशेत-पवनानगर रस्त्यावर सोमवारी (दि. 20) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गुलाबचंद फुलचंद गादिया (वय 57, रा. शिवाजी चौक, कामशेत) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत दत्ता एकनाथ वावरे, निलेश वावरे (दोघे रा. नायगाव, ता. मावळ) व एक अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत येथील बाजार पेठेत गुलाबचंद गादिया यांचे दुकान आहे.
हे दुकान दत्ता एकनाथ वावरे, निलेश वावरे यांना भाडेपट्ट्यावर दिले. त्यादुकानाचे मासिक भाडे गादिया हे मागत होते. भाडे वेळेत देता येत नसेल, तर दुकान खाली कर म्हणत होते. वारंवार दुकान खाली कर असे म्हणाल्याच्या कारणावरून वावरे आणि त्यांच्या साथीदारांनी गादिया यांची दुचाकी चिखलसे गावच्या हदीत सोमवारी सकाळी रोखून धरली.
कामशेत-पवनानगर रस्त्यावर गादिया यांना अडवून लोखंडी पाईप, लाकडी दांडके यांच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने गादिया यांचे दोन्ही हात-पायांना गंभीर दुखापत केली. तसेच शिवीगाळ करीत तुला जिवंत ठेवत नाही, अशी धमकीही आरोपींनी गादिया यांना दिली.
या प्रकरणी गादिया यांनी दत्ता एकनाथ वावरे, निलेश वावरे व एक अज्ञात व्यक्ती विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गादिया यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नीलकंठ जगताप तपास करीत आहेत.