कान्हरवाडीच्या सरपंच, उपसरपंचासह 16 जणांवर गुन्हा; खटाव तालुक्‍यात खळबळ

वडूज – सरपंच, उपसरपंच निवडी झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून बेकायदेशीर जमाव जमवून सत्कार, सभारंभ केल्याप्रकरणी कान्हरवाडी (ता. खटाव) येथील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह सोळाजणांवर वडूज पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी पोलीस अमंलदार योगेश सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कान्हरवाडीच्या सरपंच कांता चंद्रकांत येलमर, उपसरपंच महावीर शशिकांत जाधव, सदस्य संगीता वसंत जाधव यांच्यासह सतीश प्रभाकर येलमर, रामचंद्र सदाशिव येलमर, रामचंद्र महादेव येलमर, प्रदीप तात्यासो येलमर, यशवंत बाबुराव येलमर, शशिकांत बाबा जाधव, बाळू शामराव येलमर, हणमंत रामचंद्र येलमर, शंकर आत्माराम येलमर, आनंदा नामदेव जाधव, विजय उर्फ विज्या सदाशिव जाधव, बाळू लक्ष्मण चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी संचारबंदीसह इतर काही कडक निर्बंध घातले आहेत. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यात चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई असून प्रत्येकाच्या तोडांला मास्क असणे बंधनकारक केले आहे.

मात्र, संशयितांनी या आदेशाचा भंग करून दि.27 रोजी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी करोनाच्या अनुषंगाने कोणतीही खबदारी न घेता तसेच सोशल डिस्टंन्स न पाळता सत्कार सभारंभ सोहळा आयोजित केला होता. यावेळी मायणी पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस अमंलदार बापूराव खांडेकर, योगेश सुर्यवंशी, नवनाथ शिरकुळे हे गस्त घालत कान्हरवाडी तेथे आले. त्यांनी वरील सर्व संशयितांची नावे लिहून त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 269,270,188 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

बड्या धेंडांची नावे वगळली?
कान्हरवाडी (ता. खटाव) येथे मायणी पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, याच गावातील या कार्यक्रमाचे सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोवरून पोलिसांनी काहीजणांना कारवाईतून मोकळीक दिल्याचे दिसून येत आहे. केवळ सर्वसामान्यांवर कारवाई न करता फोटोत दिसणाऱ्या प्रत्येकावरच कारवाई करण्याचे धाडस मायणी पोलीस दाखवणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.