मीरपूर -कसोटी क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासात, बांगलादेशने धावांच्या निकषावरचा तिसरा मोठा कसोटी विजय मिळवला असून, त्यांनी शनिवारी अफगाणिस्तानवर 546 धावांनी मात करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. यापूर्वी इंग्लंडने 1928 मध्ये ऑस्ट्रेलियावर 675 धावांनी तर 1934 मध्ये ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 562 धावांनी विजय मिळवत विक्रम प्रस्थापित केले होते. त्यानंतर बांगला देशने 546 धावांचा विक्रम प्रस्थापित केला आहे. बांगलादेशचा यापूर्वीचा सर्वात मोठा विजय हा 2005 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 226 धावांनी होता.
मीरपूर येथे झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगला देशने सर्वबाद 382 धावा केल्या होत्या. त्यामध्ये नजमूल हुसेन शांतोचे शतक (146 धावा), सलामीवीर महमदुल हसन जॉयचे अर्धशतक (76 धावा) आणि मेहदी हसन मिराज (48) तर मुशफिकूर रहिम (47) यांच्या कामगिरीचा समावेश होता. अफगाणिस्तानकडून निजात मसूदने 79 धावांत 5 तर यमिन अहमदझई याने 39 धावांत 2 गडी बाद केले होते.
प्रत्त्युत्तरामध्ये अफगाणिस्तानचा डाव 146 धावांत कोसळला. त्यामध्ये अफसर झझाई (36) आणि नसिर जमल (35) यांनाच बरे खेळता आले. बांगलादेशकडून इबादत हुसेनने 47 धावांत 4 तर शोरिफुल इस्लाम, तैज्जुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
बांगलादेशने पहिल्या डावात 236 धावांची आघाडी घेतली तरिही फॉलो ऑन न देता, त्यांनी दुसऱ्या डावात 4 बाद 425 वर आपला डाव घोषित केला. यामध्ये नजमूल हुसेन शांतोने पुन्हा शतक झळकावत 124 धावा केल्या. सलामीवीर झाकिर हुसेनच्या 71, मोमिनूल हकच्या नाबाद 121 आणि कर्णधार लिट्टन दासच्या नाबाद 66 धावांचा समावेश होता.
तब्बल 660 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानला दुसऱ्या डावात अवघ्या 115 धावा करता आल्या. त्यामध्ये राहत शर्माच्या 30 धावा उल्लेखनीय ठरल्या. बांगलादेशकडून टस्कीन अहमदने 37 धावांत 4 तर शोरिफुल इस्लामने 28 धावात 3 विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे बांगला देशने 546 धावांनी विजय मिळवत विक्रम साकारला. दोन्ही डावात शतकी खेळी साकारलेल्या नजमूल हुसेन शांतोला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.
कर्णधारपदाच्या पदार्पणात विक्रमी विजय मिळविल्यानंतर लिटन दास म्हणाला, “या उष्णतेमध्ये गोलंदाजांनी ज्या प्रकारे प्रतिसाद दिला ते पाहणे आश्चर्यकारक होते. एका ऐतिहासिक विजयाचा घटक कर्णधार म्हणून बनतानाचा आनंद अविस्मरणीय आहे. आता आम्ही म्हणू शकतो की आमच्याकडे दर्जेदार वेगवान आक्रमण आहे. फिरकीपटूंनीही चांगली गोलंदाजी केली.
हा चांगला सांघिक खेळ होता पण त्याचे श्रेय नजमुल हुसेन, झाकीर आणि मोमिनुल यांना जाते. नजमुलने दोन्ही डावात शतके झळकावली जी या उकाड्यात सोपी नव्हती. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला म्हणाला, सामन्याच्या सुरुवातीपासूनच काहीच आमच्या मनासारखे झाले नाही. पण आमच्याकडे काही सकारात्मक गोष्टी आहेत. आम्ही कसोटीमध्ये दीर्घ विश्रांतीनंतर खेळलो आहोत. त्यात आमच्या अनेक चुका झाल्या. आता संघबांधणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. पुढील महिन्यात हे संघ तीन वनडे आणि दोन टी-20 सामने खेळणार आहेत.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : पहिला डाव : सर्वबाद 382 (नजमूल हुसेन शांतो 146, महमदुल हसन जॉय 76, मेहदी हसन मिराज 48, मुशफिकूर रहिम 47; निजात मसूद 79 धावांत 5 विकेट्स. दुसरा डाव : 4 बाद 425 (घोषित) नजमूल हुसेन शांतो 124, मोमिनूल हक नाबाद 121, झकीर हुसेन 71, लिट्टन दास नाबाद 66; झहीर खान 112 धावांत 2 विकेट्स
अफगाणिस्तान : पहिला डाव : सर्वबाद 146 (अफसर झझाई 36, नसिर जमल 35 इबादत हुसेन 47 धावांत 4 विकेट्स दुसरा डाव : सर्वबाद 115 (राहत शर्मा 30, टस्कीन अहमद 37 धावांत 4 विकेट्स, शोरिफुल इस्लाम 28 धावात 3 विकेट्स)