Cricket in Olympic : तब्बल 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट खेळले जाणार आहे. IOC ने लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये क्रिकेटच्या समावेशाची पुष्टी केली आहे. ऑलिम्पिकमध्ये एकदाच क्रिकेटचा खेळ खेळवण्यात आला होता. 123 वर्षांपूर्वी 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता.
त्याआधी 1896 साली अथेन्स येथे झालेल्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पण अपेक्षित देशांनी सहभाग नोंदवला नसल्याने आयोजिकांनी हा खेळ स्पर्धेतून रद्द केला. त्यानंतर 4 वर्षांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये याचा समावेश करण्यात आला. तेव्हा देखील फार प्रतिसाद मिळाला नाही. फक्त चार देशांनी भाग घेतला. त्यातील एक यजमान देश फ्रान्स होते.
त्यावेळी, चार संघ निवडण्यात आले होते, ज्यामध्ये ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, नेदरलँड्स आणि बेल्जियमच्या नावांचा समावेश होता, परंतु नेदरलँड्स आणि बेल्जियमने सामना सुरू होण्यापूर्वीच आपली नावे मागे घेतली, त्यानंतर ब्रिटन आणि फ्रान्सच्या संघांमध्ये सुवर्णपदकासाठी विजेतेपदाची लढत झाली. त्या सामन्यात कोणता संघ जिंकला आणि कोणते खेळाडू चमकले, याबदल जाणून घेऊ या….
पॅरिस ऑलिम्पिकसाठी नेदरलँड आणि बेल्जियम यांना फ्रान्ससोबत सह यजमानपद मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी क्रिकेटमध्ये सहभाग नोंदवला होता. पण या दोन्ही देशांचे सह यजमानपद गेल्याने त्यांनी क्रिकेटमधून माघार घेतली. त्यामुळे दोनच देश शिल्लक राहिले एक यजमान फ्रान्स (France) आणि दुसरे ग्रेट ब्रिटन (Great Britain) होय.
Cricket at Olympic : 128 वर्षांपूर्वी खेळल्या गेलेल्या एकमेव क्रिकेट सामन्याची स्थिती काय होती?
20 ऑगस्ट 1900 रोजी ऑलिम्पिकमधील क्रिकेटचा अंतिम सामना ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात खेळला गेला होता. ऑलिम्पिकच्या इतिहासातील ती एकमेव मॅच ठरली. तेव्हा वनडे क्रिकेटचा उदय झाला नव्हता फक्त कसोटी क्रिकेट अस्तित्वात होते. कसोटी सामने पाच दिवस चालायचे, पण ऑलिम्पिकमध्ये हा सामना दोन दिवसांचाच खेळवण्यात आला. यामध्ये दोन्ही संघांनी दोनदा फलंदाजी केली. विशेष म्हणजे या सामन्यासाठी नाणेफेक झाली नव्हती. संघात 11 नव्हे तर 12 खेळाडू समावेश होता.
ग्रेट ब्रिटनने प्रथम फलंदाजी केली . हा सामना कमी धावसंख्येचा ठरला, पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ग्रेट ब्रिटनचा संघ केवळ 117 धावांवर आटोपला. संघासाठी फ्रेडरिक कमिंगने सर्वाधिक 38 धावांची खेळी खेळली. तर फ्रान्स गोलंदाज डब्ल्यू अँडरसनने चार विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात फ्रान्सचा संघ केवळ 78 धावांवर गारद झाला आणि ब्रिटनला 39 धावांची आघाडी मिळाली. फ्रान्स संघाचे दोनच फलंदाज 10 धावा करू शकले. ग्रेट ब्रिटनचा एफडब्ल्यू ख्रिश्चन सात विकेट घेत सर्वोत्तम गोलंदाज ठरला.
दुसऱ्या डावात ग्रेट ब्रिटनने 5 बाद 145 धावा केल्या. त्यांनी फ्रान्सपुढे विजयासाठी 185 धावांचे आव्हान दिले. दुसऱ्या डावात ग्रेट ब्रिटनकडून बीचक्रॉफ्टने 54 आणि आल्फ्रेड बॉवरमन याने 59 धावा केल्या तर एफ. रॉक्स हा दुसऱ्या डावात तीन विकेट घेत फ्रान्ससाठी सर्वोत्तम गोलंदाज ठरला. प्रत्युत्तरात फ्रान्सचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 26 धावांत गडगडला आणि त्याचे 6 फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. ग्रेट ब्रिटनसाठी मॉन्टेगु टोलरने दुसऱ्या डावात 9 धावांत सर्वाधिक 7 बळी घेतले आणि ग्रेट ब्रिटनने अंतिम सामना 158 धावांनी जिंकून क्रिकेटमध्ये ऑलिम्पिकच्या इतिहासातील पहिले आणि आतापर्यंतचे एकमेव सुवर्णपदक जिंकले. तर पराभूत झालेल्या फ्रान्सला रौप्यपदक मिळाले. तिसरा संघच नसल्याने कांस्यपदक कोणालच मिळाले नाही.
#CWC23 #INDvAFG : रोहित शर्माचे रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकाच सामन्यात अनेक विक्रमांना गवसणी…
या स्पर्धेनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळात सहभागी होण्यास फार देशांनी उत्सुकता न दाखवल्याने क्रिकेटचा ऑलिम्पिकमधील प्रवेश 1904च्या स्पर्धेपासून थांबवला गेला. त्यानंतर आता तब्बल 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट खेळले जाणार आहे.