World Cup 2023 India vs Afghanistan :- अफगाणिस्तानविरोधात रोहित शर्माने वादळी फलंदाजी केली आहे. दिल्लीच्या मैदानावर रोहित शर्माच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 84 चेंडूत 131 धावाची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 16 चौकार आणि पाच षटकार लगावले. यासह रोहित शर्माने आपल्या खेळीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. (CWC23 : Rohit Sharma breaks multiple records with superb World Cup ton) भारतीय कर्णधार रोहित शर्माने बुधवारी (11 ऑक्टोबर) एकदिवसीय विश्वचषकात इतिहास रचला.
रोहितने कपिल देवचा विक्रम मोडला
नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध त्याने 63 चेंडूत शानदार शतक झळकावले. यासह तो एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वात जलद शतक करणारा खेळाडू ठरला. या बाबतीत रोहितने माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला. कपिल देव यांनी 1983 च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध अवघ्या 72 चेंडूत शतक झळकावले होते. कपिल देव यांच्यानंतर वीरेंद्र सेहवागचा क्रमांक लागतो. त्याने 2007 मध्ये बर्म्युडाविरुद्ध 81 चेंडूत शतक झळकावले होते.
सचिनच्या शतकांचाही मोडला विक्रम…
तसेच यासह रोहित वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या बाबतीत महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. रोहितच्या नावावर आता सात शतके आहेत. त्याने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 6 शतकांचा विक्रम मोडला. सचिननंतर श्रीलंकेच्या कुमार संघकाराचा आणि रिकी पाॅन्टिंग अनुक्रमे तीसरा व चौथा क्रमांक लागतो. संघकारानं ही कामगिरी 35 सामन्यात तर रिकी पाॅन्टिंगनं 42 सामन्यात ही कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरने चार शतके ठोकली आहे. भारतीय कर्णधार सौरव गांगुलीही चार शतकासह पाचव्या क्रमांकावर आहे.
रोहित शर्माला 2015 मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळाली. त्या आवृत्तीत त्याने शतक झळकावले. चार वर्षांनंतर, 2019 मध्ये जेव्हा तो विश्वचषक खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये आला तेव्हा त्याने पाच शतके झळकावली. आता अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावून त्याने तेंडुलकरचा12 वर्षे जुना विक्रम मोडला. सचिनने 1992 ते 2011 या सहा विश्वचषक स्पर्धेत 45 सामन्यांत सहा शतके झळकावली होती. विश्वचषकातील 19व्या सामन्यात रोहितने सचिनला मागे टाकले.
रोहितने ख्रिस गेलचा विक्रम मोडला…
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहितने आणखी एक मोठा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो जगातील फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकले आहे. या सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी हिटमॅनला सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी तीन षटकारांची गरज होती. ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 553 षटकार मारले आहेत. त्याने 483 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 551 डावांमध्ये ही कामगिरी केली. त्याचवेळी रोहितने केवळ 453 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 473व्या डावात हा विक्रम केला. अफगाणिस्तानच्या सामन्यात रोहितने एकूण 5 षटकार मारले. यासह त्याचे नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 556* षटकार झाले आहेत.
रोहित शर्मा (भारत) – 556 षटकार*
ख्रिस गेल (वेस्ट इंडीज) – 553 षटकार
शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) – 476 षटकार
ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड) – 398 षटकार
मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड) – 383 षटकार
एमएस धोनी (भारत) – 359 षटकार
विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा ठरला फलंदाज…
आणखी एक विक्रम म्हणजे, रोहित शर्मा भारताकडून विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज झाला आहे. याआधी रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर होता. हा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्माला पाच षटकारांची गरज होती. रोहित शर्माने यंदाच्या विश्वचषकातील दुसऱ्याच डावात हा विक्रम मोडीत काढला. रोहित शर्माने दोन विश्वचषकात भारतासाठी 19 सामने खेळले आहेत आणि यादरम्यान रोहितने विश्वचषकात एकूण 28 षटकार मारले आहेत.
विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
1. रोहित शर्मा – 19 सामने 28 षटकार
2. सचिन तेंडूलकर – 45 सामने 27 षटकार
3. सौरव गांगुली – 21 सामने 25 षटकार
4. वीरेंद्र सेहवाग : 22 सामने 18 षटकार
5. महेंद्र सिंह धोनी : 29 सामने 15 षटकार
वर्ल्ड कपमध्ये जलद एक हजार धावा
रोहित शर्माने विश्वचषकातील एक हजार धावांचा टप्पाही पार केला आहे. रोहित शर्मानं वन-डे विश्वचषकात सर्वात जलद 1000 धावा करण्याच्या डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाची बरोबरी केलीय. या स्पर्धेत हजार धावा करणारा रोहित चौथा भारतीय आहे. 2015 आणि 2019 च्या विश्वचषकात रोहित शर्माने खोऱ्याने धावा काढल्या होत्या. रोहित शर्माने विश्वचषकाच्या 19 व्या सामन्यात एक हजार धावांचा पल्ला पार केला. विराट कोहलीच्या आधी तीन भारतीयांनी हा पराक्रम केला आहे. सचिन तेंडुलकर , विराट कोहली आणि सौरव गांगुली यांनी याआधी विश्वचषकात भारतासाठी एक हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा : 19 डाव
डेव्हिड वॉर्नर : 19 डाव
सचिन तेंडुलकर : 20 डाव
एबी डेव्हिलियर्स : 20 डाव
व्हिव्ह रिचर्ड्स : 21 डाव
सौरव गांगुली : 21 डाव