पुणे – महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त विभागात शासनाकडून प्रतियुक्तीने एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्यानंतर अखेर या विभागाची फाळणी करण्यात आली आहे. या विभागासाठी आता दोन अधिकारी असणार असून एका अधिकाऱ्याकडे महापालिकेच्या खर्च तर एका अधिकाऱ्याकडे उत्पन्नाची जबाबदारी असणार आहे.
महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे या विभागाचे विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेत राज्यशासनाकडून प्रति नियुक्तीने आलेले जितेंद्र कोळंबे यांच्याकडे महापालिकेच्या महसूल (उत्पन्न) जबाबदारी असणार असून विद्यमान वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसका यांच्याकडे महापालिकेच्या खर्चाची जबाबदारी असणार आहे. मात्र, त्याच वेळी पालिकेच्या अंदाजपत्रकाचे काम कळसकर यांच्याकडेच ठेवण्यात आले.
महापालिकेत वित्त व लेखा अधिकारी एक पद होते. 2014 मध्ये शासनाने महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीत आणखी एका पदाची वाढ केली. त्यानंतर, या नवीन पदावर शासनाने तुषार दौंडकर यांची नियुक्ती केली होती. मात्र, दौंडकर यांच्या बदलीनंतर 2019 पासून हे पद अद्यापही रिक्त होते. त्यामुळे या दोन्ही पदांचा कारभार महापालिकेच्या मुख्य व लेखा अधिकारी उल्का कळसकर यांच्याकडे आहे.
महापालिकेत दोन पदे नियुक्त करताना महापालिका अर्थसंकल्पातील जमा बाजूसाठी एक अधिकारी आणि खर्चाच्या बाजूसाठी दुसरा अधिकारी काम करणे अपेक्षित आहे. काही वर्षांपूर्वी यातील जमा बाजूची जबाबदारी महापालिकेत प्रतिनियुक्तीने आलेले तत्कालीन उपायुक्त तुषार दौंडकर यांच्याकडे दिलेली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांची बदली होईपर्यंत त्यांच्याकडे लेखा व वित्त विभाग देण्यात आलाच नाही. मात्र, यावेळी महापालिका आयुक्तांनी या विभागाचे विभाजन करत आता दोन अधिकाऱ्यांकडे हा कारभार दिला आहे.
– वित्तीय कारभार 2 अधिकारी पाहणार
– 2014 मध्ये दुसऱ्या पदाची निर्मिती
– आर्थिक बाबीत शासनाचा थेट हस्तक्षेप