पॅरिस – रशियाने कीव्हचा पाडाव केल्यास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन थांबणार नाहीत. ते संपूर्ण युरोपचे शत्रू आहेत. त्यामुळे युरोपियन लोकांनी कच न खाता रशियाला खंबीरपणे उत्तर देण्यासाठी तयार राहावे, असे आवाहन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (French President Emmanuel Macron) यांनी केलं आहे. (Europe should prepare for war against Russia; Explosive statement of the President of France)
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला आता दोन वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. अद्याप या युद्धातून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यातच आता युद्धाची व्याप्ती वाढण्याची चिंता निर्माण झाली आहे. त्यावर मॅक्रॉन यांनी केलेलं हे विधान युक्रेन युद्धाची व्याप्ती वाढवणारं ठरणार आहे.
मागच्या महिन्यातच मॅक्रॉन यांनी म्हटले होते की, भविष्यात युक्रेनमध्ये फ्रेंच सैन्य तैनात करण्यास आम्ही कसूर करणार नाही. या विधानानंतर फ्रान्समधील इतर नेत्यांनी सहमती दर्शवली नव्हती. मात्र पूर्व युरोपमधील काही देशांनी या विधानाला पाठिंबा दिला.
एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मॅक्रॉन म्हणाले, रशियाने जर हे युद्ध जिकलं तर युरोपची विश्वासाहर्ता शून्यावर येईल. त्यांच्या या विधानानंतर फ्रान्समधील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी टीका केली असून मॅक्रॉन युद्धखोरीची भाषा बोलत असल्याचे म्हटले.
विरोधकांच्या टीकेबाबत मॅक्रॉन म्हणाले, मी विरोधकांच्या मताशी असहमत आहे. आज युक्रेनला पाठिंबा देण्यापासून दूर राहणे किंवा युक्रेनच्या मदतीच्या विरोधात मतदान करण्यासारखा निर्णय घेऊन आपण शांतता निवडत नसून पराभव निवडत आहोत. जर युरोपमध्ये युद्ध ठिणगी पडली तर त्यासाठी रशिया जबाबदार असेल. जर आपण आज मागे राहण्याचा किंवा घाबरून बसण्याचा निर्णय घेतला, तर आपण आजच पराभव स्वीकारत आहोत, असे मी मानतो आणि मला हे मान्य नाही.