संजू सॅमसन याच्याबाबत संपूर्ण भारतीय क्रिकेटप्रेमींनी जीतकी चिंता व काळजी व्यक्त केली ती वाया जात आहे हे तर पुन्हा एकदा सिद्ध झाले. पूर्वी असे वाटायचे की, त्याच्यावर अन्याय होत आहे मात्र, आता लक्षात येते की त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर आवश्यक असतो तो दर्जाच नाही. त्यामुळे आता त्याने पुढील काळात जीतकी त्याची कारकीर्द असेल तेवढा काळ केवळ आयपीएलच खेळावी.
खरेतर ऋषभ पंत जेव्हा अपघातग्रस्त झाला त्यावेळी सॅमसनला सुवर्णसंधी होती की, संघात स्थान मिळवत आपल्या कामगिरीच्या जोरावर ते कायम राखावे. मात्र, त्याने ती फुकट घालवली. त्याला जीतकी संधी मिळाली ती पाहता त्याच्याकडे दर्जाच नाही हे तर आता सिद्धही झाले आहे. आयपीएल स्पर्धेत त्याने जेव्हा शतकी खेळी केली तेव्हापासून त्याला प्रत्यक्ष भारतीय संघात स्थान खूप कमी वेळा मिळाले. मात्र, त्याला भारतीय संघाकडून आतापर्यंत तब्बल 15 एकदिवसीय सामन्यांत तर तब्बल 24 टी-20 सामन्यांसाठी संघात स्थान मिळाले. त्यात त्यानं काय दिवे लावले हे तर त्याची आकडेवारी पाहीली की लगेचच लक्षात येते.
त्याच्यापेक्षा काल परवा आलेला तो साई सुदर्शन पाहा. पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक तर पाठोपाठ दुसऱ्या सामन्यातही त्याने अर्धशतक फटकावले. ही खेळी त्याने अशावेळी केली जेव्हा भारतीय संघाला अशा नवोदितांकडून होत असलेल्या जबाबदार खेळींची सर्वात जास्त गरज आहे. सुदर्शनची ही दोन्ही अर्धशतके दक्षिण आफ्रिकेत साकार झाली ती देखील तेथील वातावरणात व जेव्हा भारतीय संघाला या धावांची गरज होती.
आता कोणताही आजी-माजी क्रिकेटपटू, समालोचक किंवा सोकॉल्ड समिक्षक निवड समिती, कर्णधार, मुख्य प्रशिक्षक किंवा एकूणच बीसीसीआय़ची खेळाडू निवड प्रक्रीया यांवर सॅमसनसाठी टीका करु शकणार नाही. त्याला जीतकी संधी द्यायची तीतकी देऊन झाली. प्रयोग करण्यासाठी आता पुढील सहा महिने आपल्याकडे मोठा संकेंड बेंच आहे.
त्यांच्यातून रोटेशन करत व प्रयोग करत आगामी काळात वेस्ट इंडिज व अमेरिकेत पुढील वर्षी होत असलेल्या टी-20 विश्वकरंडकासाठी संघ तयार करु परंतू आता सॅमसनची काहीही गरज नाही. ज्याला संधीचे सोने करता येत नाही तो देशाला विश्वकरंडक काय मिळवून देणार. त्यापेक्षा लोकेश राहुल, इशान किशन, दुखापतीतून बरा झाला व संघात परतला तर पंत आहेच की सॅमसनची गरजच काय.