Indian Premier League 2024 (PBKS vs RR Match 27) : इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 27 व्या सामन्यात पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना आज (शनिवार, 13 एप्रिल) चंदीगड येथील मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. गेल्या सामन्यात राजस्थानला गुजरात टायटन्सविरुद्ध सलग 5 सामने जिंकण्याची संधी होती. पण, संघाला अपयशी ठरला. अशा स्थितीत संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाला पंजाब किंग्जविरुद्धच्या त्या सामन्यातील चुकीची पुनरावृत्ती करायला आवडणार नाही.
पंजाब किंग्जने सुरुवातीच्या सामन्यात खराब कामगिरी केल्यानंतर आता वेग पकडताना दिसत आहे. मात्र, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात संघाचा पराभव झाला होता. हा सामना अतितटीचा झाला आणि शेवटी हैदराबादने 2 धावांनी विजय मिळवला. अशा स्थितीत पंजाब किंग्जला राजस्थानविरुद्ध कोणत्याही किंमतीत विजय मिळवायचा आहे.
PBKS vs RR : गुणतालिकेतील स्थिती…
इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. राजस्थानने लीगमध्ये आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने चार सामने जिंकले आहेत आणि एक सामना गमावला आहे. यासह राजस्थानचा संघ 8 गुणांसह गुणतालिकेत (दिल्ली-लखनौ सामन्यापूर्वी) अव्वलस्थानी आहे. अशा परिस्थितीत पंजाबसाठी राजस्थानचे आव्हान सोपे असणार नाही. या आयपीएलमधील पंजाब किंग्जच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर संघ फारसा लयीत दिसला नाही. शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan ) नेतृत्वाखाली पंजाबच्या संघानं लीगमध्ये आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामने जिंकले आणि तीन सामने गमावले आहेत. ते गुणतालिकेत 4 गुणासह (दिल्ली-लखनौ सामन्यापूर्वी) आठव्या स्थानावर आहेत.
PBKS vs RR : कोणाचे पारडे जड….
पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे संघ आयपीएलमध्ये एकूण 26 वेळा आमनेसामने आले आहेत. या कालावधीत राजस्थान रॉयल्सने 15 वेळा विजय मिळवला आहे. तर पंजाबने 11 सामन्यात राजस्थानचा पराभव केला आहे. याशिवाय राजस्थानने पंजाबविरुद्ध 226 अशी सर्वोच्च धावसंख्या उभारलेली आहे. याबाबतीत पंजाबही मागे नाही. राजस्थानचा सामना करताना पंजाबने 223 अशा सर्वोच्च धावसंख्येची नोंद केलेली आहे.
PBKS vs RR : Pitch Report
महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियमवर आतापर्यंत फक्त दोन आयपीएल सामने खेळले गेले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये स्कोअर 170 आणि 180 च्या आसपास सहज पोहोचला. यापूर्वी येथे एकही आंतरराष्ट्रीय सामना झाला नव्हता. या खेळपट्टीवर फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांना जवळपास समान प्रमाणात मदत मिळते. अशा स्थितीत फलंदाजांसाठी येथे धावा करणे इतके सोपे नाही.
संजू सॅमसनला पंजाब किंग्स कसे रोखणार?
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून संघाला त्याच्याकडून आणखी एका चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. पंजाबविरुद्ध त्याची बॅट जोरात बोलते. सॅमसनने पंजाब किंग्जविरुद्धच्या 21 आयपीएल सामन्यांच्या 21 डावांमध्ये 39 च्या सरासरीने आणि 144 च्या स्ट्राइक रेटने 702 धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकेही झळकावली. संजूने पंजाब किंग्जच्या प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध धावा केल्या आहेत. पण, लेगस्पिनर राहुल चहर पंजाबसाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो. मात्र, आतापर्यंतचा हा मोसम त्याच्यासाठी खराब गेला आहे. राहुल चहरने आयपीएलच्या 7 डावात दोनदा सॅमसनला बाद केले आहे.
धवनशिवाय बेअरस्टोलाही कराव्या लागतील धावा ,
पंजाब किंग्जची सर्वात मोठी अडचण ही आहे की शिखर धवनशिवाय दुसरा कोणताही महान फलंदाज मोठी खेळी खेळत नाही. जॉनी बेअरस्टोने 5 सामन्यात 81 धावा केल्या आहेत. लिव्हिंगस्टोननेही 3 सामन्यात 83 धावा जोडल्या आहेत. शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग निश्चितपणे प्रयत्न करत आहेत. पण, राजस्थानविरुद्ध फलंदाजीला एक युनिट म्हणून खेळावे लागेल. अर्शदीप सिंगशिवाय कागिसो रबाडालाही गोलंदाजीत ताकद दाखवावी लागणार आहे.
राजस्थानला गोलंदाजीत करावी लागेल सुधारणा…
गेल्या सामन्यात राजस्थान विजयाच्या उंबरठ्यावर आल्यावर गुजराज टायटन्सविरुद्ध पराभूत झाला. सॅमसनने त्या सामन्यात मोक्याच्या क्षणी चूक केली होती. डेथ ओव्हर्समध्ये त्याने ट्रेंट बोल्टला 2 षटके शिल्लक असताना गोलंदाजी दिली नाही.परिणामी गुजरातने शेवटच्या 2 षटकात 35 धावा काढत सामना जिंकला.
PBKS vs RR : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11 खालीलप्रमाणे…
आयपीएलमधील दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी पाहिल्यानंतर या सामन्यासाठी पंजाब आपल्या प्लेइंग 11 मध्ये बदल करू शकतो असे दिसते. तर राजस्थान रॉयल्सच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे.
राजस्थान रॉयल्स संभाव्य 11 : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रायन पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल, केशव महाराज
पंजाब किंग्ज संभाव्य 11 : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरान, सिकंदर रझा, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, प्रभसिमरन सिंग.