भारतीय संघाची वेस्ट इंडिजविरुद्धची मोहीम सुरू झाली. आता या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत चाहत्यांना भारतीय संघाकडून कॅरेबियन संगीत किंवा दर्दभरे नगमे ऐकावे लागणार हे लवकरच समोर येणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध गेल्या काही वर्षांतील आपली कामगिरी सातत्याने सरस होत आहे. मात्र, त्यावेळी भारतीय संघात अनुभवी खेळाडूंचा भरणा जास्त होता. ती परिस्थिती आज दिसत नाही. आजच्या संघात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे वगळता एकही फलंदाज तसा अनुभवी नाही.
सलामीवीर यशस्वी जयस्वाल कर्णधार रोहित शर्मासह डावाची सुरुवात करेल. तिसरा क्रमांक शुभमन गिलकडे राहील. चौथ्या क्रमांकावर कोहली तर पाचव्या क्रमांकावर रहाणे खेळेल. झाली संपली आपल्या फलंदाजांची यादी. मग ईशान किशन, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर हे फलंदाजीला येतील. म्हणजे पाच प्रमुख फलंदाज संघात असले तरीही त्यांच्याकडून कशी कामगिरी होते हे महत्त्वाचे आहे.
कसोटी सामने वेस्ट इंडीजमध्ये होणार आहेत व त्यांच्याकडे गोलंदाजी आज तरी भारतीय संघापेक्षा जास्त अनुभवी आहे. त्यातही केमार रोश जास्त धोकादायक आहे. त्याच्याकडे दोन्ही स्विंग आहेत, बाउन्स आहे, रिव्हर्स स्विंग करण्याचीही क्षमता आहे. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीसमोर भारतीयांची फलंदाजी कशी बहरते ते पाहणे उत्कंठावर्धक आहे.
कॅरेबियन कोलॅप्सो सीरीजचे संगीत वाजू लागले तर भारतीय प्रेक्षकांसाठी ती पर्वणी ठरेल. मात्र, दर्दभरे नगमे सुरू झाले तर या मालिकेचा निकाल पहिल्याच कसोटी सामन्यात लागलेला दिसेल.
सध्याच्या भारतीय संघाकडे पाहिले तर कागदावर तरी सगळे वाघच आहेत. मात्र, महत्त्वाच्या मालिकांमध्ये या वाघांची मांजर झालेलीही अनेकदा दिसून आले आहे. रोहित, कोहलीसह बाकी सर्व फलंदाजांना मिळून किमान चारशे धावा पहिल्या डावात फलकावर लावाव्या लागतील तरच वेस्ट इंडिजवर दबाव टाकणे शक्य होइल.
वेस्ट इंडिजकडे उदयोन्मुख फलंदाज आहेत पण त्यांनी अद्याप भारतीय फिरकी गोलंदाजी खेळलेली नसल्याने अश्विन व जडेजा चमत्कार करू शकतील. मात्र, आपल्या वेगवान गोलंदाजीचे काय. एकचा महंमद सिराज काय करणार. त्याच्या जोडीला जयदेव उनाडकट आहे परंतु त्याच्याकडून अद्याप आश्वासक कामगिरी यापूर्वी झालेली नाही. नवदीप सैनी किंवा मुकेश कुमार हे पर्याय संघात असतानाही रोहितने ही निवड केल्याचे नवलच वाटत आहे. असो, मालिका तर सुरू झाली आहे आणि आता रोहित किंवा कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. हे सर्व जमून आले तरच कॅरेबियन संगीताच्या तालावर भारतीय चाहते नाचू लागतील.