जामखेड – तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सहा वाड्यांचे विभाजन करून खर्डा शहराची वेगळी स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचा एकमुखी निर्णय ठरावाद्वारे करण्यात आला. गोंधळात ग्रामसभेला उपस्थित खर्डा शहरातील युवकांनी ग्रामपंचायतचे विभाजन झालेच पाहिजे,अशी मागणी लावून धरल्याने अखेर ग्रामपंचायत सदस्यांनीही उभे राहून या ठरावाला पाठिंबा दिला. खर्डा ग्रामपंचायत विभाजनाचा लेखी ठराव एकमुखाने घेण्यात आला.
ग्रामसभेत घेण्यात आलेला हा ठराव पुढील कारवाईसाठी ग्रामविकास मंत्रालयात पाठवण्यात येणार असून याला मंजुरी मिळाल्यानंतर खर्डा शहरासाठी नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दि. 12 जुलै रोजी घेण्यात आलेल्या खर्डा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत ग्रामस्थ व युवक अक्रमक झाल्याचे दिसून आले.यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. या मागणीबरोबरच गावाला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा,शहरातील अनधिकृत कमानी काढणे, बाजारतळावर महिलांसाठी शौचालय बांधणे, कमिटी चौकातील ग्रामपंचायतची जुनी इमारत पाडणे, जुनी ग्रामपंचायत ते गडीपर्यंत रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा येणारे अतिक्रमण काढणे, तसेच अनेक मुद्दयावर चर्चा होऊन ग्रामसभेत ठराव घेतलेल्या निर्णयावर पुढे कारवाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने यावेळी घेतला आहे. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संजीवनी पाटील होत्या. ग्रामसभेचे प्रास्ताविक व आभार ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते यांनी मांडले. या ग्रामसभेला विविध विभागाचे अधिकारी, महिला, युवक व खर्डा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते