लंडन – विम्बल्डन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत कडव्या लढतीनंतर रशियाचा डॅनियल मेदवेदेव याने उपांत्य फेरीत प्रवेश केला. या फेरीत आता त्याची लढत स्पेनच्या कार्लोस अल्कराझशी होणार आहे.
उपांत्यपूर्व फेरीत मेदवेदेवने अमेरिकेच्या ख्रिस्तोफर युबान्सवर 6-4, 1-6, 4-6, 7-6, 6-1 असा पाच सेटपर्यंत चाललेल्या लढतीत पराभव केला.
पहिला सेट जिंकल्यावर त्याला पुढील दोन सेट गमवावे लागले व सामन्यात त्याचा पराभव स्पष्ट दिसू लागला होता. मात्र, अनुभवाच्या जोरावर त्याने सामन्यात थाटात पुनरागमन केले व अखेरचे दोन्ही सेट जिंकत सामनाही जिंकला व उपांत्य फेरीत प्रवेश केला.
अन्य उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कराझने डेन्मार्कच्या होल्गर रुनवर 7-6, 6-4, 6-4 अशी सहज मात केली व उपांत्य फेरी गाठली.
आता उपांत्य फेरीत मेदवेदेवचा सामना अल्कराझशी होणार आहे. दुसरा उपांत्य सामना सर्बियाचा संभाव्य विजेता नोवाक जोकोविच व इटलीच्या जेन्नीक सिन्नर यांच्यात होणार आहे.