हडपसर परिसरात पोलिसांवरही दबावतंत्र!
पुणे – डॉक्टरचे अपहरण करुन खंडणी उकळल्याचा प्रकार हडपसर येथे नुकताच उघडकीस आला. यामध्ये एका पोलिसासह स्वयंघोषित पत्रकाराचाही समावेश आहे. हडपसर पोलीस ठाण्यात स्वयंघोषित पत्रकारावर गुन्हा दाखल होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी अशाच एका ठगाच्या घरात दारुचा अड्डा होता. एकंदरच हडपसर पोलीस ठाण्यात राजकारणी, स्वयंघोषित पत्रकार, स्वयंसेवक आणि मध्यस्थांचा राबता वाढत आहे. पोलीस अधिकारीही अशा प्रकरणांत तडजोडीवरच धन्यता मानतात. एखादे प्रकरण अंगावर आले किंवा थेट गुन्हे शाखेने कारवाई केली, तरच गुन्हे दाखल होतात.
…म्हणून “मांडवली’ करणाऱ्यांचे फावते
हडपसर पोलीस ठाण्याची हद्द मोठी असल्याने येथे दोन पोलीस निरीक्षक (गुन्हे) आहेत. तर, विकासामुळे जमिनींना मोठा भाव आला आहे. बांधकामेही जोरात आहेत. जमीन व्यवहारांमुळे घराघरात वाटणीवरुन वाद होत आहेत. जमीन विक्रीसाठी दबाव टाकणाऱ्या टोळ्याही निर्माण झाल्या. बांधकाम व्यवसायात राजकीय नेतेही भागीदार झाले. यामुळे दबाव टाकणे, विरोधकांची प्रकरणे बाहेर काढणे, बदनामी असे सर्व चक्र सुरू झाले. यातूनच छोट्या-मोठ्या कारणांसाठी पोलिसांकडे धाव घेण्याचे प्रकार वाढले. ही बाब “मांडवली’ करणाऱ्या मध्यस्थांच्या पचणी पडली. यामुळे पोलीस, तक्रारदार आणि विरोधक यांच्यामध्ये मध्यस्थी करणारी एक साखळी निर्माण झाली.
बोगस पत्रकारांची टोळी
मध्यस्थांमध्ये अनेकदा इस्टेट एजंट किंवा राजकीय व्यक्ती असतात. मात्र, काही पोलीस अधिकारी राजकारणी आणि मध्यस्थांना भीक घालत नाहीत. यामुळे आपसुकच एक स्वयंघोषित पत्रकारांची टोळी येथे उदयाला आली. पत्रकारितेच्या नावावर पोलिसांवर दबाव टाकणे, मध्यस्थीला भाग पाडणे किंवा विरोधात वृत्त प्रसारित करण्याची धमकी देत दलाली सुरू झाली. हा प्रकार फोफावण्यास पोलीस अधिकारीही जबाबदार आहेत.
पोलिसांच्या भूमिकेचा संशय
स्वयंघोषित, स्वयंसेवक, पत्रकारांमार्फत प्रकरण आल्याने काही अधिकारी आर्थिक मलई लाटू लागले. तर काही अधिकारी बदनामी किंवा बदली होईल या भीतीने त्यांच्या दबावाखाली राहू लागले. मात्र, मध्यस्थांची कधीही खातरजमा करावी, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना वाटले नाही का? हा प्रश्न आहे. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त होत आहे.
पोलीस म्हणतात…
हडपसर पोलीस ठाण्यातीलच एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “येथे दर तासाला एखादा व्यक्ती येऊन पत्रकार असल्याचे सांगतो. त्याचे कार्ड बघता, तो काम करत असलेले माध्यम कधीही माहितीतील नसते. यामुळे विश्वास ठेवायचा का, हा प्रश्न पडलो. मोबाइलद्वारे शुटिंग केल्याचा आविर्भाव केला जातो. यानंतर काही दिवसांत ते राजकीय व्यक्ती, गुंठामंत्र्यांना घेऊन मध्यस्थीसाठी येऊ लागतात. मागील काही दिवसांत आम्ही तीन स्वयंघोषित पत्रकारांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापुढे ही या प्रकारांची गांभीर्याने दखल घेतली जाणार आहे.