स्टॉलधारकांची घटली संख्या, किमतीत वाढ
बोपखेल – करोना महामारीचा सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. तसेच सण, उत्सव देखील करोनामुळे सार्वजनिक स्वरूपात साजरे करता येत नाहीत. करोनामुळे शहर सोडून गेलेल्या कामगार व ग्रामीण भागातील नागरिकांनी गावाकडे स्थलांतर केले आहे. त्यामुळे गणेशमूर्ती विक्रीवर याचा परिणाम झाला आहे.
दरवर्षी श्रावण महिना सुरू झाला की गणेशोत्सवाचे वेध लागतात. पुणे म्हटले की गणपती उत्सव हा सर्वात मोठा सण. परंतु हा उत्सव यावर्षी करोना महामारी संकटात सापडला आहे. त्यामुळे बोपखेल परिसरात दरवर्षी 30 ते 35 गणेशमूर्तींची विक्री करणारे स्टॉल असतात. परंतु यावर्षी मात्र केवळ 15 स्टॉल आहेत. गणपती बाप्पा दोन-चार दिवसांवर आले की बऱ्यापैकी बुकिंग झालेले असते. परंतु यावर्षी बुकिंग कमी आहे. गणपती उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांची व मंडळांची जी धावपळ असते ती आज पाहण्यास मिळत नाही. बाजारपेठा सजावटीच्या साधनांनी भरल्या आहेत; परंतु नागरिकांचा खरेदीकडे कल कमी आहे.
बाजारपेठांमधील दुकानदार व गणपती स्टॉल लावलेले विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु करोनामुळे नागरिकांची गणपती खरेदीसाठी लगबग दिसून येत नाही. दरवर्षी एक एक महिना अगोदर गणपतीचे बुकिंग केले जाते. मात्र यावर्षी गणेश चतुर्थी चार दिवसांवर येऊन ठेपली असताना गणेशभक्तांचा प्रतिसाद कमी आहे.
यावर्षी गणेशमूर्तींचे “बुकिंग’ कमी
दरवर्षी गणेशमूर्तीसाठी मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त बुकिंग करत असतात. यावर्षी गणेशमूर्तींचे स्टॉल लावण्यास उशीर झाला आहे. तसेच दरवर्षी एवढे स्टॉल देखील नाहीत. परंतु नागरिकांचे गणेशमूर्ती बुक करण्याचे प्रमाण कमी आहे. करोनामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.
किमतीत झाली वाढ
करोनाकाळात लॉकडाऊनमुळे बऱ्याच कच्च्या मालांच्या किमती वाढल्या आहेत. तसेच वाहतूक देखील वाढली आहे. तसेच कारागीर मिळत नसल्याने मजुरी जास्त द्यावी लागत असल्याने यावर्षी गणेशमूर्तींच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.
करोनाच्या भीतीपोटी यंदा काही गणेशमूर्ती विक्रेत्यांनी स्टॉल लावले नाहीत. नागरिकांचा देखील साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल आहे. सजावटीचे साहित्य खरेदीसाठी देखील गर्दी नाही. दरवर्षी स्टॉलची संख्या जास्त असून बुकिंग देखील जास्त असते; परंतु यावर्षी स्टॉल कमी असून देखील बुकिंग कमी आहे. आतापर्यंत 25 टक्के देखील गणेशमूर्तींची विक्री झाली नाही.
– दीपक थिटे, विक्रेते