पुणे – शहरातील “स्वच्छ’ सहकारी सेवा संस्थेच्या कचरा वेचकांना झोपडपट्टीतील कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेकडून 10 रुपयांऐवजी 20 रुपये देण्याची मागणी मान्य करण्यात आली. करोनाच्या साथीतही कचरावेचक जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन कचरा गोळा करत असलेल्या कचरा वेचकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 14 ऑगस्टपासून शहरात आंदोलन सुरू केले होते; तसेच कचरा वेचकांच्या आयुर्विम्याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मंगळवारी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
झोपडपट्टीतील कचरा गोळा करण्यासाठी 30 रुपये प्रती घरटी मिळावी, अशी मागणी कचरा वेचकांनी केली होती; त्यांना 20 रुपये प्रती घरटी प्रती महा देण्याचे मान्य करण्यात आले तर शहरातील कचरा वेचकांना 2 लाख रुपयांचे विमा कवच देण्याबाबतचा प्रशासनाकडून प्रस्ताव दाखल झाल्यास त्याबाबतही कार्यवाही केली जाईल असेही रासने यांनी सांगितले.
आयुर्विम्याबाबतही लवकरच निर्णय
पुणे शहरात “स्वच्छ’ सहकारी सेवा संस्थेच्या माध्यमातून 3 हजार 665 कचरा वेचक आहेत. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे 635 कचरा वेचक दररोज कचरा गोळा करण्याचे काम करतात. महापालिकेच्या गलिच्छ वस्ती निर्मूलन विभागातर्फे शहरातील सर्व कचरा वेचकांना दोन लाखाचे विमा कवच देण्याबाबतची कार्यवाही चालू असून, स्थायी समितीच्या मान्यतेनंतर त्याची अंमलबजावणी होईल, असेही स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.