निबंधक कार्यालयाला चार महिन्यांपासून कुलुप
बिबवेवाडी – हवेली क्रमांक 2 दुय्यम नोंदणी निबंधक कार्यालय चार महिन्यांपासून बंद असल्याने बिबवेवाडी परिसरातील अंदाजे एक ते दीड हजार दस्तऐवज नोंदणीचे काम रेंगाळल्याने शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाला आहे. तसेच, मुद्रांक शुल्काचा भरणा करून देखील अनेक दाखल दस्त अर्धवट नोंदणीमुळे अडकून पडले आहेत. यातून नागरिकांचीही मोठी गैरसोय होत असून याबाबत वकिलांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
सातारा रस्त्यावरील बिबवेवाडी कॉर्नर येथे पुष्पमंगल कार्यालय शेजारील दुय्यम नोंदणी निबंधक कार्यालय बंद आहे. पुणे शहरातील करोना विषयक कंटेन्मेंट झोन पुनर्रचना केल्यानंतर शहरातील जवळपास सर्व दुय्यम नोंदणी निबंधक कार्यालये सुरू झाली आहेत; परंतु पुणे शहर हवेली क्रमांक दोन कार्यालय अद्यापही बंद आहे. हे कार्यालय सुरू होण्यासाठी वकील व स्थानिक नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्यामुळे हे कार्यालय “लॉकडाऊन’ केल्याची चर्चाही परिसरात आहे.
दुय्यम नोंदणी निबंधक कमी असल्याने हे कार्यालय सुरू करता आलेले नाही. इतर कार्यालयात काही अधिकारी करोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे बिबवेवाडी दुय्यम नोंदणी निबंधक कार्यालय कधी सुरू होईल हे सांगता येत नाही.
– जी. एस. कोळेकर, पुणे मुद्रांक जिल्हाधिकारी
दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 2 हे कार्यालय बंद असल्याने बिबवेवाडीतील जमीन, सदनिकांचे रजिस्ट्रेशन खोळंबले आहेत. सरकारला यातून महसूल मिळत असतानाही हे कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे ते तातडीने सुरू करावे.
– ऍड. रमेश धर्मावत