तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे येथे तब्बल दोन महिन्यानंतर गावात संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत आरोग्य विभागाने अधिकृत दुजोरा दिला नाही.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील एका नागरिकाला खासगी दवाखान्यातून कोरोना तपासणीसाठी पुणे येथे जाण्यास सांगितले होते. दरम्यान, गावात संशयित रुग्ण आढळला असल्याच्या अफवांना उधाण आले आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर असून अफवा पसरू नये, असे आवाहन पोलिसांनी पुन्हा केले आहे.
गावात दोन महिन्यांत कोणताच रुग्ण सापडला नव्हता. परंतु, या नव्याने संशयित रुग्णामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान, शिक्रापूरमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची वाढ होत असताना आता पुन्हा तळेगाव देखील करोनाच्या विळख्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासन करीत आहे. या संदर्भात प्रशासन योग्य उपाययोजना करीत आहेत.