कोविडच्या चाचण्यांसाठी वीज न लागणारे सेंट्रीफ्युज मशिन

न्यूयॉर्क – कोविडच्या चाचण्यांसाठी रुग्णाच्या लाळेचे नमुने तपासावे लागतात. मात्र वैद्यकीय विज्ञानामध्ये विशेष प्रगत नसलेल्या देशांमध्ये लाळेतील विशिष्ट घटक वेगळे करून त्याची तपासणी करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांच्या नेतृत्वाखालील स्वस्तातील, वीजेची आवश्‍यकता नसलेले सेंट्रीफ्युज मशिन विकसित केले आहे. हे मशिन खूपच स्वस्तातील असून “मेडरेक्‍सिव्ह’ नावाच्या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये त्याचे विश्‍लेषण प्रसिद्ध होणार आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या घटकांचा वापर करून हे सेंट्रीफ्युज मशिन तयार करण्यात आले आहे. याची किंमत अगदी 5 डॉलर इतकी कमी आहे.

या स्वस्तातल्या मशिनच्या वापरामुळे लॅम्प ऍसे नावाच्या निदानपद्धतीचा सहज वापर करणे संशोधकांना शक्‍य होणार आहे. “लॅम्प ऍसे’ या निदानपद्धतीमध्ये लाळेत करोना विषाणूची गुणसूत्रे आहेत का तपासता येऊ शकते. “लॅम्प’ पद्धती अतिशय सोपी असून त्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणाची आवश्‍यकता नाही. नमुने तपासणीस घेतल्यापासून तासात निकाल मिळू शकतो. व्यवसायिक रिएजेन्ट वापरल्यावर एक डॉलर इतका कमी खर्च येतो.

लाळेतील विषाणू ओळखण्यासाठी हे घटक लाळेतून वेगळे करणे आवश्‍यक असते. त्यासाठी 2 हजार “आरपीएम’च्या वेगाने फिरणारे सेंट्रीफ्युज आवश्‍यक असते. त्या मशिनची किंमत शेकडो डॉलर असू शकते. शिवाय त्याला वीजपुरवठाही आवश्‍यक आहे.

मात्र हाताने फिरवता येण्याजोगे मशिन स्टॅनफोर्ड विद्यापीठातील बायोइन्जिनरिंगचे प्राध्यापक मनू प्रकाश यांनी विकसित केले आहे. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील ब्रायन रॅबे आणि कॉन्स्टन्स सेपको या वैज्ञानिकांनी विकसित केलेल्या पद्धतीच्या प्रोटोकॉलचे पालन या हॅन्डीफ्युज-लॅम्प पद्धतीमध्ये केले जाते.

या मशिनच्या वापरामुळे चाचणीचा खर्च आणि वेळ दोन्हीची बचत होऊ शकते आहे. आता या पद्धतीचा अवलंब प्रत्यक्ष रुग्णाच्या नमुन्यांच्या आधारे केल्यावर या मशिनला वैध मान्यता मिळू शकेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.