नवी दिल्ली – करोना विषाणूच्या ओमायक्रॉन अवतारामुळे अवघ्या जगाची चिंता वाढली आहे. ज्या ज्या देशांमध्ये ओमायक्रॉनने प्रवेश केला आहे तेथील रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशातच आता भारतीयांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी हाती आली असून राजधानी दिल्लीमध्ये आज (शनिवारी) आढळलेल्या एकूण रुग्णांच्या संख्येत ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये २४९ नवे रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी येथे १८० रुग्ण आढळले होते.
देशाच्या इतर भागांप्रमाणेच दिल्लीमध्ये देखील नागरिक कोव्हीडसंबंधित सुरक्षिततेच्या उपायांची पायमल्ली करताना दिसतायेत. बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी, मास्क, सॅनिटायझर यांचा वापर न करणे या दिल्लीकरांच्या व्यवहाराबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने चिंता देखील व्यक्त केली होती.
ख्रिसमस व नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होण्याची शक्यता पाहता दिल्ली आपत्ती व्यवस्थापन विभागाने निर्बंध लादले आहेत. राजधानी दिल्ली व देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये करोनाचे रुग्ण वाढताना दिसतायेत. महाराष्ट्र व दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक बाधित आढळले आहेत.
शनिवारी राजधानी दिल्लीमध्ये आढळलेली रुग्णसंख्या ही १३ जूननंतरची सर्वाधिक रुग्णसंख्या असून शनिवारचा पॉझिटिव्हिटी रेट हा ९ जूननंतरचा सर्वाधिक आहे. यावर्षी १३ जूनला राज्यात २५५ रुग्ण आढळून आले होते. तर ९ जूनला पॉझिटिव्हिटी रेट ०.४६ टक्के इतका होता. आज वाढलेल्या रुग्णांमुळे दिल्लीतील सक्रिय बाधितांची संख्या ९३४ इतकी झाली असून ही गेल्या ५ महिन्यांतील सर्वाधिक आहे. गेल्या २४ तासांमध्ये एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला असून यामुळे एकूण मृतांचा आकडा २५१०४ इतका झालाय.
प्राप्त आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांमध्ये ९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दिल्ली येथे ४६४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.