चंडीगढ –सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) शनिवारी पंजाबच्या फिरोजपूरमध्ये हेरॉईन या अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला. त्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 55 कोटी रूपये इतकी असल्याचे समजते. भारत-पाकिस्तान सीमेलगत असणाऱ्या फिरोजपूरमध्ये बीएसएफच्या जवानांनी पहाटेच्या सुमारास नियमित स्वरूपाची शोधमोहीम राबवली. त्यावेळी हेरॉईन साठा सापडला.
भारतीय हद्दीत पाकिस्तानातून तस्करीमार्गे अंमली पदार्थ पाठवण्याचे प्रयत्न वारंवार होतात. त्यामुळे तस्करीचे डाव उधळण्यासाठी बीएसएफकडून सतर्कता बाळगली जाते. पंजाबमध्ये अंमली पदार्थांच्या समस्येने तीव्र स्वरूप धारण केले आहे. त्याचे राजकीय पडसादही उमटताना दिसतात. विधानसभा निवडणूक जवळ आल्याने राजकीय पक्षांकडून विविध मुद्दे पुढे केले जात आहेत. त्यामध्ये अंमली पदार्थांचाही मुद्दा आहे.