नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या लोकांना आपल्या मूळ गावी परतण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानंतर नांदेडहून काही भाविक पंजाबमध्ये परतले होते. त्यापैकी 351 जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पंजाबमधील करोनाग्रस्तांचा आकडा 741 वर पोहोचला आहे. याआधीही नांदेडहुन पंजाबमध्ये परतलेल्यांपैकी काही जणांना करोनाची लागण झाली होती.
नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्यांचे करोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरुद्वारा, लंगर साहिब आणि संपूर्ण परिसर सील करण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खाल्लाळ यांनी दिली. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांची तपासणी होणार आहे. तसेच जिल्ह्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
नांदेडमधील गुरुद्वारा लंगर साहिब परिसरात राहणाऱ्या 97 व्यक्तींचा स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यातील 20 रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यातील 25 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 11 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. या व्यक्तींना एनआरआय भवन कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात करोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे गुरुद्वार परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.