पुणे – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उद्योग क्षेत्रातील कामगारांची करोना चाचणी करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर शहरातील व्यापारी, त्यांचे कामगार, पथारीवाले, भाजीविक्रेते यांचीदेखील करोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी दिली.
शहरातील व्यापाऱ्यांच्या स्वतंत्र करोना चाचण्या करण्यात येणार आहेत. यातून सामूहिक संसर्ग रोखण्यात मदत होणार आहे. शहरातील विविध दुकाने सम-विषम तारखेनुसार उघडण्यात आली आहेत. त्यामुळे दुकानांमध्ये आणि विविध विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. दुकानांमध्ये दिवसभर अनेक ग्राहक येत असतात. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला.