वाघोली -हवेली तालुक्यातच्या पूर्व पट्ट्यात गुरुवारी (दि. 23) रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
हवेली तालुक्यातील शिरसवडी, मुरकुटे नगर, वाडेबोल्हाई, गावडेवाडी, बिवरी, डोंगरगाव, पिंपरीसांडस, अष्टापूर आदी भागात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. रस्त्यांवरून पूरस्थितीचे पाणी वाहिल्याने रस्ते खचून गेले आहेत.
तर शेतामधील साचलेले पाण्यामुळे शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पाच तास झालेल्या पावसाने पूर्व हवेलीच्या भागातील प्रचंड नुकसानाची तीव्रता नागरिकांना येऊ लागली आहे.
तातडीने शेतकऱ्यांच्या व सामान्य नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना मदत करण्याचे आवाहन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी संचालक माणिकराव गोते यांनी केले आहे.
गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झालेल्या पावसामुळे परिसरातील शेती, छोटे-मोठे लघुउद्योग, अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्या बरोबर सामान्य नागरिकांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे.