पुणे( प्रतिनिधी) – ‘स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक साथी आल्या. त्यांचा सामना त्यावेळी सर्वांनी केला. मात्र त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेली कोरोनाची साथ आपण पाहत आहोत. या कोरोनाने आपल्या सर्वांना खूप काही शिकवले असल्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पुणे शहरात कोरोना रुग्णांची वाढती असताना, सर्व पदाधिकाऱ्यांनी काम केल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने सर्वांचा आभारी आहे, असेही पाटील म्हणाले.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या स्थानिक आमदार निधीतून १ कोटी रुपयांचे वैद्यकिय साहित्य गणेश कला क्रीडा रंग मंच येथील कोविड सेंटरकरिता भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, नगरसेवक योगेश समेळ, नगरसेविका गायत्री खडके, भाजप युवा मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष बापू मानकर उपस्थित होते.
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोना आजाराच्या काळात सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व तोपरी मदत केल्याचे आपण पाहिले आहे. आज त्याचाच एक भाग म्हणून, कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता ताई टिळक यांनी १ कोटी रुपयांचे साहित्य दिले आहे. त्याबद्दल खूप आभारी असून त्यांच्यासारखे सर्व लोकप्रतिनिधींनी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच ते पुढे म्हणाले की, आता आपण आजारातून बाहेर पडल्यावर आर्थिक संकटातून कसे बाहेर पडायचे? हा प्रश्न अनेकांच्यासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे आता आपल्याला अशा सर्वांना आर्थिक संकटामधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार मुक्ता टिळक म्हणाल्या की, ‘मी माझ्या आमदार निधीतून १ कोटी रुपयांचे वैद्यकीय साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. त्यामध्ये बेड्स, व्हेंटिलेटर आणि औषधे देण्यात आली आहेत. यापुढील काळात देखील, जी मदत लागेल ती मदत केली जाणार आहे. पुणे शहर लवकरात लवकर कोरोना मुक्त व्हावे, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करूयात’.