पानीपत – विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना हरियाना येथील पानीपत येथून समोर आली आहे. एक खासगी ट्युशन टीचर आपल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याला घेऊन फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फरार झालेली महिला शिक्षिका घटस्फोटीत आहे. खासगी शाळेत टीचर म्हणून काम करत असलेली ही शिक्षिका आपल्या माहेरीच राहात होती. तक्रारीत विद्यार्थ्याच्या वडिलाने म्हटलं की, त्यांचा मुलगा रोजच्या प्रमाणे २९ मे रोजी दुपारी २ वाजता ट्युशनसाठी गेला होता. मात्र त्यानंतर तो परत आलाच नाही.
दरम्यान विद्यार्थ्याच्या घरच्यांनी सुरुवातीला बराच वेळ वाट पाहिली. त्यानंतर महिला शिक्षिकेच्या पित्याने आपली मुलगी देखील गायब असल्याचं सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी महिला शिक्षिकेवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून दोघांचा शोध घेण्यात येत आहे. गायब झाल्यापासून शिक्षिका आणि विद्यार्थ्याचा फोन स्वीचऑफ येत आहे.
अल्पवयीन विद्यार्थी मागील दोन वर्षांपासून महिलेकडे शिकवणीसाठी जात आहे. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थी शिक्षिकेच्या घरी चार ते पाच तास शिकवणीसाठी जात होता. मात्र दोघेही अचानक २९ मे रोजी गायब झाले आहेत. विशेष म्हणजे घरून निघून जाताना दोघांनी सोबत काहीही सामान नेलं नाही. केवळ महिला शिक्षिकेच्या हातात सोन्याची अंगठी आहे.