पुणे – पोलिसांशी धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात
पती-पत्नीला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
शंकर पोटे (वय ३०), त्याची पत्नी दीपाली (वय २५, दोघेही, रा. गल्ली क्रमांक ३ , आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत.
बचाव पक्षातर्फे ऍड. वाजेद खान (बीडकर) आणि ऍड. आरिफ खान यांनी बाजू मांडली. मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल चंद्रकांत केंद्रे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. २५ मे रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर येथील गल्ली क्रमांक ३ येथे ही घटना घडली.
पोलीस मदतीचा फोन आल्याने फिर्यादी आणि आणखी एक पोलीस घटनास्थळी गेले होते. त्यावेळी पोटे याची एका व्यक्तीसोबत भांडणे झाली होती. त्याच्याकडे पिस्तूल आहे, त्याला अटक करा, असे पोटे म्हणत होता. याबाबत पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार देण्यास फिर्यादीने सांगितले. त्यावेळी त्याने फिर्यादीच्या शर्टची गचंडी धरून धक्काबुक्की केली. तर कपडे फाडून खोटी फिर्याद देऊन कामाला लावणार असल्याचे त्याच्या पत्नीने म्हटले.
दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अधिक तपासासाठी त्याला आणि पत्नीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली. ती मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.