शिक्रापूर -शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील एका नागरिकास करोनाची लागण झाली होती, त्यांनतर मागील आठवड्यात शिक्रापूर येथील सोनोग्राफी सेंटरमधील एका डॉक्टरचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची घटना ताजी असताना आता विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील एका दोन वर्षीय बालिकेला करोनाची लागण झाल्याचे खासगी अहवालात समोर आले आहे. यामुळे करोना पुन्हा शिरूर तालुक्यावर घोंगावू लागल्यामुळे खळबळ उडाली आहे.
शिक्रापूर येथील एका सोनोग्राफी सेंटरमधील डॉक्टरला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. या डॉक्टरच्या करोनाबाबतच्या तपासण्या केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांनतर सोनोग्राफी सेंटरमध्ये कामाला असलेल्या आठ कामगारांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. लगेचच याठिकाणी सोनोग्राफी केलेल्या तब्बल 144 गरोदर महिलांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते.
यापैकी 62 महिलांची तपासणी केली असताना त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले; परंतु या महिलांपैकी एका महिलेच्या घरातील व्यक्तींनी त्यांच्या घरातील महिलेच्या संपर्कातील काही व्यक्तींची खबरदारी म्हणून पुणे येथील एका हॉस्पिटलमध्ये तपासणी केली. त्यांच्या कुटुंबातील एका दोन वर्षीय बालिकेचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे शिक्रापूर परिसर हादरून गेला आहे. विठ्ठलवाडी गावाने खबरदारी म्हणून गावातील सर्व अंतर्गत रस्ते बंद करून गाव पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावामध्ये प्रत्येक ठिकाणी औषध फवारणी करीत वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
विठ्ठलवाडी येथील संपूर्ण गावाचा सर्व्हे करण्याचे काम सुरू आहे. मुलीच्या संपर्कातील 36 जणांचे नमुने तपासणीसाठी घेतलेले आहेत. त्या सर्व 36 लोकांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तसेच त्या मुलीचे खासगी अहवाल पॉझिटिव्ह आले. मात्र मुलीचा एनआयव्हीचा अहवाल येणे बाकी आहे.
– डॉ. प्रज्ञा घोरपडे,
वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव ढमढेरे.
विठ्ठलवाडी येथील त्या बालिकेचा खासगी तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे; परंतु एनआयव्ही (राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था) चा अहवाल येणे बाकी आहे. तसेच हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र, गावामध्ये फवारणी करीत अन्य कार्यवाही करण्याचे काम सुरू केले आहे.
सर्वत्र करोनाचा प्रादुर्भाव होत असताना पूर्वीच गाव निर्जंतुकीकरण करीत, गावात प्रत्येक कुटुंबाला मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले आहे; परंतु सध्या नव्याने गावात करोना संशयित आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गाव पूर्णपणे लॉकडाऊन केले आहे. गावामध्ये पुन्हा औषध फवारणी केली असून, मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच खबरदारी घेतली जाणार आहे.
– ललिता गाडे, सरपंच, विठ्ठलवाडी.