प्रयोगशाळेला दिले जात असलेले अमेरिकेचे अनुदान बंद
वॉशिंग्टन – चीनच्या वुहान येथील एका व्हायरॉलॉजी लॅबोरेटरीतून करोनाचा विषाणू बाहेर पडल्याचे जे वृत्त प्रसारित झाले आहे त्याची आम्ही शहानिशा करीत आहोत, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. या विषाणूने जगभरात आत्तापर्यंत दीड लाख लोकांचा बळी घेतला असून एकट्या अमेरिकेतील मृतांचा आकडा 35 हजार झाला आहे.
या वृत्ताच्या संबंधात अमेरिकन गुप्तचर यंत्रणा आता अधिक माहिती संकलित करीत आहेत, अशी माहितीही अमेरिकेच्या वतीने देण्यात आली आहे. या संबंधात आज पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, ही बातमी आमच्याही निदर्शनाला आली आहे, त्यात आम्ही लक्ष घातले आहे. अनेकांनीही त्यात लक्ष घातले असून त्यात काही तरी तथ्य असावे असे वाटू लागले आहे. ट्रम्प म्हणाले की, त्यांनी सुरुवातीला विशिष्ट प्रकारच्या वटवाघळाचा दाखला दिला होता.
त्या वटवाघळांतून हा विषाणू पसरल्याचे त्यांनी म्हटले होते, पण तशा प्रकारची वटवाघळे त्या भागात दिसून येत नाहीत, असे निरीक्षणही ट्रम्प यांनी नोंदवले. ते वटवाघूळ तेथून चाळीस मैलावर आढळते असेही त्यांनी नमूद केले. गुप्तचर यंत्रणा या सर्व माहितीची पडताळणी करीत असून त्यातूनच नक्की काय घडले याची माहिती समोर येईल असे ते म्हणाले. सध्या अनेक विचीत्र घडामोडी घडताहेत. आम्ही त्याचा तपास करून छडा लावणार आहोत, पण जे काही जगापुढे आले आहे ते चीनमधूनच आले आहे आणि त्यामुळे जगातील 184 देश त्रस्त झाले आहेत असे ते म्हणाले.
अमेरिकेतर्फे वुहानमधील त्या लॅबला दिले जाणारे अनुदान आता बंद केले जात आहे अशी घोषणाही त्यांनी केली. या लॅबला अमेरिकेतर्फे 3.7 दशलक्ष डॉलर्सचे अनुदान दिले जाते ते त्वरित बंद होईल असेही त्यांनी नमूद केले. अमेरिकेतील अनेक संसद सदस्यांनीही करोनाच्या प्रसाराबद्दल चीनला दोषी ठरवले असून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.