Corona New Variant : मागच्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाचे सावट कमी झाल्याचे दिसून आले होते. मात्र आता पुन्हा एकदा देशात या जीवघेण्या कोरोनाने डोके वर काढतो की काय? अशी भीती व्यक्त होत आहे. कारण केरळमध्ये कोरोनाच्या नव्या जेएन.1 व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आल्याने पुन्हा एकदा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. केरळमुळे कर्नाटकमधील आरोग्य यंत्रणाही कामाला लागल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून आता कर्नाटकमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मास्कसक्ती करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
केरळमध्ये जेएन.1 व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्यानंतर कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी सोमवारी कर्नाटकमधी उपाययोजनांची माहिती दिली. मंगळवारी यासंदर्भात कर्नाटक आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक होत असून त्यामध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मास्कसक्ती करण्यात येणार असल्याची माहिती राव यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान, नव्या व्हेरिएंटचा रुग्ण केरळमध्ये आढळला असून कर्नाटकमध्येही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार असल्याची माहिती राव यांनी दिली. मात्र, यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. “आत्ता सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांसाठी मास्कसक्ती लागू करण्यात आलेली नाही. पण जर कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली, तर आपल्याला अशा नियमावली लागू करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. मात्र, सध्या तशी कोणतीही परिस्थिती नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये”, असे म्हणत राव यांनी लोकांना आश्वस्त केले.
पुढे राव यांनी बोलतानामी “मी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये यासंदर्भात चर्चा केली आहे. यासंदर्भातील समितीने ज्येष्ठ नागरिक व हृदयाशि निगडित आजार असणाऱ्या व्यक्तींना मास्कसक्ती करण्याची शिफारस केली आहे”, असे त्यांनी म्हटले. “कर्नाटक-केरळ सीमेवर या व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी आम्ही आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. कुणालाही ताप, सर्दी किंवा खोकला असल्यास त्याची कोरोना चाचणी केली जाईल. राज्यातील रुग्णालयांना चाचण्यांची संख्या वाढवण्याबरोबरच अतिरिक्त बेड, ऑक्सिजन सिलेंडर, पीपीई किट्स व इतर आवश्यक सामग्रीसंदर्भात तयारी करण्याचेही निर्देश दिले आहेत”, असंही राव म्हणाले.