Ram Mandir Inauguration : अयोध्येतील राम मंदिराच्या आंदोलनात आघाडीवर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी पुढील महिन्यात होणाऱ्या मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख सचिव चंपत राय यांनी याबाबत माहिती दिली आहे. दोन्ही ज्येष्ठ नेते प्रकृती आणि वयाच्या कारणांमुळे या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
अयोध्येतील राम मंदिराची उभारणी करणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, माजी उपपंतप्रधान अडवाणी आणि माजी मनुष्यबळ विकास मंत्री जोशी प्रकृती अस्वास्थ्यामुळे समारंभाला उपस्थित राहू शकणार नाहीत. आडवाणी आणि जोशी हे खूप वयस्कर आहेत. त्यांचे वय लक्षात घेता. आम्ही त्यांना न येण्याची विनंती केली होती आणि दोन्ही नेत्यांनी ते मान्य केले आहे. तसेच 15 जानेवारीपर्यंत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर प्राणप्रतिष्ठेची पूजा 16 जानेवारीपासून सुरू होईल आणि 22 जानेवारीपर्यंत चालेल, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील.”
#WATCH | Ayodhya: Champat Rai, the General Secretary of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra says, “Murli Manohar Joshi and Lal Krishna Advani will not be able to attend the ceremony due to health and age-related reasons. Both (Advani and Joshi) are elders in the family and… pic.twitter.com/XZpWbXVJVS
— ANI (@ANI) December 19, 2023
दरम्यान, अयोध्येत राम मंदिर उभारले जावे यासाठी लालकृष्ण आडवाणी यांनी 90च्या दशकात रथयात्रा काढली होती. त्यांच्या आंदोलनाचा मोठा फायदा राम मंदिराच्या वातावारण निर्मितीसाठी झाला होता. मुरली मनोहर जोशी यांचंही योगदान महत्त्वाचं होतं. त्यामुळे हे दोन्ही नेते रामलल्लाच्या प्रतिष्ठापणेसाठी उपस्थित राहण्याची दाट शक्यता होती. मात्र ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. आडवाणी हे 96 तर जोशी हे 90 वर्षांचे आहेत. वयाचा विचार करून त्यांनी या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी चंपत राय यांनी जानेवारीमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाची माहिती देखील दिली आहे. ते म्हणाले की, विविध परंपरेतील 150 ऋषी-संत आणि सहा दर्शन परंपरेतील शंकराचार्यांसह 13 आखाडे या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. कार्यक्रमासाठी सुमारे चार हजार संतांना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय 2200 इतर पाहुण्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. काशी विश्वनाथ, वैष्णोदेवी या प्रमुख मंदिरांचे प्रमुख, अध्यात्मिक गुरू दलाई लामा, केरळच्या माता अमृतानंदमयी, योगगुरू बाबा रामदेव यासोबतच अभिनेते रजनीकांत, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अरुण गोविल, चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, प्रसिद्ध चित्रकार वासुदेव यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्तीही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. प्राणप्रतिष्ठेनंतर 24 तारखेला मंडल पूजा करण्यात येणार असून भाविकांसाठी मंदिर जानेवारीपासून खुलं होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.