नवी दिल्ली – मलेशियामध्ये करोनाचे दररोज 8 हजाराहून अधिक रुग्णांची वाढ होत असल्याने सरकारने देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे.
1 ते 14 जून दरम्यान लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात सर्व सामाजिक आणि आर्थिक क्षेत्राच्या संचालनास परवानगी दिली जाणार नाही. केवळ आवश्यक आर्थिक सेवांना सूट दिली जाईल.
सिन्हुआ न्यूज एजन्सीने शुक्रवारी पंतप्रधान कार्यालयाचा हवाला देत ही माहिती दिली. सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अचानक नवीन रुग्णांची वाढ होऊ लागल्याने आणि देशात रुग्णालयांची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे देशातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा ढासळण्याआधीच सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
येत्या 15 दिवसांत परिस्थिती सुधारल्यास आणि प्रकरणे कमी झाल्यास काही आर्थिक क्रियांना परवानगी दिली जाईल. अलिकडच्या काही आठवड्यांमध्ये करोना संसर्गामध्ये वाढ झाली आहे.
शुक्रवारी 8,920 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तर 61 मृत्यूंची नोंद झाली. यानंतर, देशात करोना संक्रमितांची संख्या वाढून 549,514 झाली आणि मृतांचा आकडा 2,552 वर पोहोचला आहे.