पौड -मुळशी तालुक्यात पौड येथे करोनाचा पहिला रूग्ण आढळून आला असून तालुक्यात करोना रुग्णांची संख्या आता 43वर पोहचली आहे. गेली तीन-चार महिने करोनामुक्त असलेल्या तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेल्या पौडमध्ये करोनाचा शिरकाव झाला आहे.
पौडमधील सापडलेल्या रूग्णाला दोन दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. हा रूग्ण त्यावेळी पौड ग्रामीण रूग्णालयात गेला. त्यानंतर या रूग्णाला औंध येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवार (दि. 28) या रूग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर यांनी दिली.
हा रूग्ण राहत असलेला इमारत तसेच परिसर बंद करण्यात आला करण्यात आला असून ठिकाणी औषध फवारणीही करण्यात आलेली आहे. तालुक्यात एकूण संख्या 43वर पोहचली असून त्यापैकी आतापर्यंत 23 रूग्ण बरे होऊन आपल्या घरी आलेले आहेत. उर्वरित रुग्णांवर उपचार चालू आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, सरपंच धनश्री दहितुले, पोलीस पाटील संजय पिंगळे, ग्रामसेवक विजय कदम यांनी पौड पंचक्रोशीतील नागरिकांना सोशल डिस्टसिंगचा वापर करावा. बाहेर जाताना सॅनिटायझर तसेच मास्कचा वापर करावा. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे आणि नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.