आज जिल्ह्यात आणखी 25 नव्या रुग्णांची भर
नगर (प्रतिनिधी) – शहरात आज आणखी 13 करोनाबाधीत रुग्ण आढळले आहे. त्यात पाईपलाईन रोड, तोफखाना, आडते बाजार, भिंगार येथे व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या 422 वर पोहचली आहे. त्यामुळे शहरातील भिंगार, नवनागापूर परिसरातही करोनाचा शिरकाव झाला आहे.
शहरात आज सायंकाळी एकूण 13 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील पाच, ढवण वस्ती येथील एक, पाईपलाईन पद्मा नगर येथील एक, आडते बाजार येथील पाच आणि भिंगार येथील एक रुग्ण बाधित आढळून आले आहे. तसेच सकाळी 12 व्यक्ती बाधित आढळून आल्या होत्या. दिवसभरात एकूण 25 बाधितांची भर पडली आहे. तसेच जिल्ह्यात 12 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील सहा, अकोले आणि पारनेर तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.
संगमनेर तालुक्यात कुरण येथे दोन, पिंपरणे आणि साकुर येथे एक आणि संगमनेर शहरात हुसेननगर आणि लखमिपुरा येथे एक बाधित रुग्ण आढळून आला.पारनेर तालुक्यातील गोरेगाव आणि अकोले शहरातील कांदा मार्केट येथे प्रत्येकी एक बाधित रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव रुग्ण संख्या आता 125 झाली आहे. तसेच 70 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचा माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
दहा रुग्णांना डिस्चार्ज
जिल्ह्यातील 10 रुग्णांनी आज कनोनावर मात केली. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, संगमनेर मधील पाच, नगर मनपा दोन, पारनेर, नगर आणि अकोले तालुका प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 283 इतकी झाली आहे.