डॉ. विठ्ठल शिवणकर यांची सचिवपदी निवड
सातारा (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शनिवारी (दि. 27) फेरनिवड करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीची सभा अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली. त्यात आगामी तीन वर्षांसाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. नवी मुंबई येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांची सचिवपदी निवड करण्यात आली. सातारच्या धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड यांची उच्च शिक्षण सहसचिवपदी, नगर येथील संजय नागपुरे यांची माध्यमिक शिक्षण विभागाच्या सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे.
संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, जयश्री चौगुले, अरुण कडू-पाटील, पी. जे. पाटील, आ. चेतन तुपे यांच्या निवडी करण्यात आल्या. मॅनेजिंग कौन्सिल सदस्यांच्याही निवडी करण्यात आल्या. या निवडी नेहमी कर्मवीर पुण्यतिथीला, म्हणजेच 9 मे रोजी केल्या जातात; परंतु यंदा करोनामुळे या निवडी लांबणीवर पडल्या होत्या. सामाजिक अंतराचे नियम पाळून झालेल्या सभेस संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते.
डॉ. अनिल पाटील, ऍड. भगीरथ शिंदे, उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, रामशेठ ठाकूर, ऍड. रवींद्र पवार, मीना जगधने, डॉ. विश्वजित कदम, प्रभाकर देशमुख, दादाभाऊ कळमकर, बाबासाहेब भोस, मुमताजअली शेख, डॉ. यशवंत थोरात, रामचंद्र गायकवाड, कृष्णराव घाटगे, डॉ. भारत जाधव, डॉ. शिवलिंग मेनकुदळे, चंद्रकांत वाव्हळ, डॉ. भाऊसाहेब कराळे, विलास महाडिक, प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, अँन्थनी ऍलेक्स डिसोझा, तुकाराम कण्हेरकर, प्रा. डॉ. काळुराम कानडे, यांची मॅनेजिंग कौन्सिल सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.