पुणे – पुण्यात एकाच दिवसात दहा पोलिसांना करोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. एका दिवसात एवढ्या पोलिसांना करोनाचा संसर्ग होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पुणे पोलीस दलातील 120 जणांना आजवर करोनाची लागण झाली आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. मात्र, एक दिलासादायक बाब म्हणजे करोनावर मात करणाऱ्या पोलिसांचे देखील प्रमाण मोठे आहे. लॉकडाऊनचे शिथिल होताच लोकांचा मुक्त संचार वाढला आहे.
बंदोबस्तानिमित्त पोलिसांचा नागरिकांसोबत संबंध येतो. त्यातूनच पोलिसांनाही करोनाचा धोका वाढतो आहे. शहरातील अनेक महत्त्वाच्या ठाण्यांतील पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे पोलीस ठाण्याचे कामकाज चालवण्याचा प्रश्न तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची चिंता वरिष्ठांना सतावते आहे.
करोना पॉझिटिव्ह पोलिसांमध्ये हडपसर, दत्तवाडी, कोथरुड पोलीस ठाण्यातील तसेच मुख्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन महिला कर्मचारी आहेत. त्यांच्या संपर्कातील 35 जणांना क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांच्या टेस्टचा अहवाल सोमवारी मिळेल. यातील पाच कर्मचारी कंटेन्मेंट झोनमध्ये राहायला आहेत. तर, एक कर्मचारी सीक लिव्हवरून परतल्यावर त्याला त्रास झाला होता. त्याची टेस्ट केल्यावर तो पॉझिटिव्ह आढळला. सध्या 35 पोलीस कर्मचारी उपचार घेत असून 75 कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत.
– अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे