557 रुग्णांची भर : 11 जणांचा करोनाने मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने आज आठ हजारांचा टप्पा ओलांडला. शहरात आज नवीन 557 रुग्णांची भर पडली आहे. तर “करोना’ने मंगळवारी आणखी 11 जणांचा बळी घेतला. अकरा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
शहरात मंगळवारी 535 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 22 रुग्णांनाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 8171 इतकी झाली आहे.
आजपर्यंत करोनामुळे 173 जणांचा मृत्यू झाला आहे. आज शहरातील 9 व शहराबाहेरील 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील थेरगाव, घरकुल, मोशी येथील तीन महिलांचा मृत्यू झाला. तर इंद्रायणीनगर, कासारवाडी, चिंचवड, नेहरुनगर, तळवडे, आनंदनगर येथील सहा रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच शहराबाहेरील तळेगाव रोड व पुणे येथील दोन पुरुषांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, मंगळवारी दिवसभरात 281 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 4879 इतकी झाली आहे. शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शहरात लॉकडाउन करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी शहरातील 2204 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 1856 रुग्णांचे चाचणी अहवाल येणे अद्याप प्रलंबित आहेत.
जून महिन्याच्या मध्यापासून “करोना’ने उग्र रुप धारण केले आहे. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात रोज शंभरहून अधिक रुग्ण आढळत होते. त्यानंतर हा आकडा वाढतच गेला आहे. जुलै महिन्यात तर हा आकडा कैक पटीने वाढला आहे. चाचण्या अधिक होत असल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. वायसीएम येथे “करोना’ चाचणीची सोय उपलब्ध करुन दिली आहे. तरी देखील चाचणी अहवाल प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने एक हजाराच्या पुढे आहे. मंगळवारी देखील तब्बल 1856 रुग्णांचा अहवाल प्रलंबित आहे.
रोज मोठ्या संख्येने करोनाबाधित रुग्ण आढळत असतानाच करोनाने मृत्यूचा विळखा देखील आवळण्यास सुरुवात केली आहे. 15 जूनपासून रोज शहरात करोनामुळे मृत्यू होत आहेत. परंतु जून महिन्यात रोज एक ते तीन रुग्णांचा बळी जात होता. परंतु जुलै महिन्यात रोज सात ते अकरा रुग्णांचा मृत्यू होत आहे. सोमवारी शहरात सर्वाधिक मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. सोमवारी शहरात उपचाराधीन असलेल्या 17 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी देखील करोनामुळे 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.