युरोप, पश्चिम आशियातील देशांमधून मोठी मागणी
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातून निर्यात होणाऱ्या हळदीला युरोप आणि पश्चिम आशियातील देशांमध्ये मागणी वाढली आहे. मात्र, बहुतांशी देशांनी आंतरराष्ट्रीय हवाई मार्ग बंद केल्याने मागणी वाढूनही हळदीची अपेक्षित निर्यात होऊ शकत नसल्याची परिस्थिती आहे.
अगदी कॅन्सरपासून सर्व रोगांवर गुणकारी असे भारतीय हळदीचे औषधी गुण आहेत. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिक पुन्हा हळदीच्या औषधी गुणाकडे वळल्याचे चित्र आहे. निर्यातदार व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, जर्मनीत हळदीची मागणी वाढली आहे. नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये हळदीची उत्पन्न येत असते. परंतु, कच्च्या हळदीची मागणी 300 टक्क्यांनी वाढली आहे. परंतु, परदेशातील विमान सेवा बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांना याचा फायदा घेणे अवघड असल्याची माहिती निर्यातदार व्यापाऱ्यांनी दिली.
जगातील एकूण हळदीच्या उत्पादनापैकी 80 टक्के हळदीचे उत्पादन हे भारतात होते. त्यातील 15 ते 20 टक्के हळद निर्यात होते. आंध्र प्रदेश हा हळदीच्या उत्पादनात नंबर एकवर असल्याने मुंबई बाजारात तिथूनच मोठ्या प्रमाणात हळद येते. त्या पाठोपाठ तामिळनाडू आणि सांगली, साताऱ्यावरून हळद येते. मुंबई बाजारात दक्षिण भारतातून हळद येत असली तरी तिचा प्रवास हा व्हाया सांगली असा होतो. कारण कच्च्या हळदीवर प्रक्रिया करणारे कारखाने हे सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत.
त्यामुळे दक्षिण भारतातील ही हळद सांगलीला येते. तिथे तिच्यावर प्रक्रिया केली जाते. तिचे पॉलिशिंग होते. पॅकिंग झाल्यानंतर ती मुंबईच्या बाजारात दाखल होते. शेतातून निघणारी कच्ची हळद ही फार वेगळी असते. ती सुकवून तिच्यावर प्रक्रिया करावी लागते. या गुणकारी कच्च्या हळदीबरोबच सुकविलेल्या हळदीलादेखील जगभरात मोठी मागणी आहे.
गेल्या दहा दिवसांपासून हळदीची मागणी वाढल्याची परिस्थिती आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी साधरण 300 किलो हळदीची निर्यात केली जात होती. मार्चपासून निर्यातीत वृद्धी आली आहे. सध्या परदेशातून दररोज तीन टन हळदीची मागणी नोंदविली जात आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाणावरील निर्बंधांमुळे हळदीची निर्यात जवळपास बंद झाली आहे. त्याचा फटका उत्पादक व व्यापाऱ्यांनादेखील बसत आहे.