राज्यभरात 15 हजारांहून अधिक फेऱ्या रद्द
पुणे – करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रवासी संख्या घटल्याने एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक फटका शिवनेरी बस सेवेला सहन करावा लागत आहे. राज्यभरातील 15 हजारांहून अधिक फेऱ्या बंद केल्याने एसटी महामंडळाचे गेल्या दोन दिवसांत सुमारे 3 कोटीहून अधिक रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
करोनाच्या प्रादुर्भावाने राज्यभरातील आगारांमध्ये प्रवाशांची तुरळक गर्दी दिसत आहे. त्यामुळे, महामंडळाला महसूल देणाऱ्या आगारातील उत्पन्न कमी मिळत आहे. करोना प्रादुर्भावाचा संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून शाळा, महाविद्यालय आणि काही खासगी कंपन्या बंद केल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने बाहेरगावी जात आहेत. त्यांच्या सोयीसाठी जादा बस सोडण्याचे आदेश एसटी महामंडळाला दिल्याची माहिती परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांनी दिली आहे. तसेच, खासगी बस चालकांनी जादा भाडे आकारण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देशही परब यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.
18 हजार बस डीप क्लीन वॉश
कर्मचाऱ्यांकडून एसटी महामंडळाच्या तब्बल 18 हजार बसची स्वच्छता केली आहे. राज्यात दररोज 18 हजार एसटी बसच्या माध्यमातून 67 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एसटी बस “डीप क्लीन वॉश’ केल्या आहेत.