Turmeric Market – हिंगोली येथील मोंढ्यात मार्च अखेर नंतर हळदीच्या भावात काही प्रमाणात का होईना तेजी आली असून त्यामुळे मोंढ्याचे व्यवहार सुरु होताच शुक्रवारी ता. 5 तब्बल 20 हजार क्विंटल हळदीची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे आता पुढील आदेशापर्यंत हळदीचे खरेदी विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी सांगितले.
हिंगोलीच्या मोंढ्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड जिल्हयासह विदर्भातून हळद विक्रीसाठी आणली जाते. मोंढ्यात हळदीचे वजन झाल्यानंतर तातडीने पैसे मिळतात शिवाय या भागात हळद खरेदीसाठी सांगली परिसरातील व्यापारी येत असल्याने हिंगोलीच्या मोंढ्यात हळदीच्या खरेदी विक्रीची मोठी उलाढाल होते.
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला हळद 7 हजार रुपये क्विंटल प्रमाणे विक्री होत असल्याने हळद उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले होते. मात्र मागील काही दिवसांत हळदीच्या भावाने चांगलीच तेजी घेतली आहे. आता नवीन हळद देखील सुरु झाली असून बाजारात असलेल्या तेजीमुळे शेतकऱ्यांनी हळदीचा साठा करण्यात ऐवजी विक्रीलाच पसंती दिल्याचे चित्र आहे.
हिंगोलीच्या मोंढ्यात सध्या हळद 13 हजार ते 14500 रुपये क्विंटल प्रमाणे खरेदी केली जात आहे. मार्च अखेर नंतर ता. 3 एप्रिल पासूून मोंढ्याचे व्यवहार सुरु झाले. त्यानंतर गुरुवारी ता. 4 रात्री पासूनच हळद उत्पादक शेतकऱ्यांनी मिळेल त्या वाहनाने हळद विक्रीसाठी आणली आहे. संत नामदेव हळद बाजार ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या सुमारे 1 किलो मिटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.