वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहायक पोलीस निरीक्षकासह सहा जणांचा समावेश
दै. “प्रभात’च्या वृत्तमालिकेची दखल
पुणे – दै. “प्रभात’ने येरवडा पोलीस ठाण्यातील भ्रष्ट कारभार आणि अवैध धंदेवाल्यांशी लागेबांधे एका वृत्तमालिकेद्वारे उघड केले होते. याची वरिष्ठ पातळीवर दखल घेत थेट गुन्हेशाखेच्या युनिट चारच्या पथकाकडून अवैध धंदेवाल्यांवर कारवाई केली. यानंतर येरवडा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली होती. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. गिरमकर, पोलीस नाईक अ. सा. गवळी, कि. ज. सांगळे आणि सहायक फौजदार राजू बहिरट दोषी आढळले. यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख यांची सेवानिवृत्तीपर्यंत, तर इतरांची दोन वर्षे वेतनवाढ रोखली. एकाच पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सहा जणांना शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी हा आदेश काढला.
चौकशी अहवालात असे म्हणण्यात आले आहे की, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख व पोलीस निरीक्षक अजय वाघमारे येरवडा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांबाबत वर्तमानपत्रात अनेकदा बातम्या प्रसिद्ध होऊन पोलीस दलातील जनमानसातील प्रतिमा मलीन झालेली आहे. या बातम्यांच्या अनुषंगाने युनिट चारच्या पथकाकडून येरवडा कार्यक्षेत्रातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्याने गुन्हा दाखल आहे.
तसेच एक व्यक्ती अवैध दारूची विक्री करत असताना करोना आजाराने मृत पावला. यावरून संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध मटका, जुगार व दारू विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. वास्तविक पोलीस उपायुक्त (परिमंडळ 4) पंकज देशमुख यांनी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वत: पोलीस ठाण्यात भेट देऊन युनूस शेख व अजय वाघमारे यांना अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
अवैध धंदेवाल्यांकडे पडताळणी
प्राथमिक चौकशीमध्ये अवैध धंदेवाल्यांचे मोबाइल नंबर प्राप्त करून त्यांच्याशी कोणते अधिकारी व कर्मचारी यांनी संपर्क साधला याची पडताळणी केली असता सहायक पोलीस फौजदार राजू बहिरट, (सध्या नेमणूक मुख्यालय), पोलीस नाईक अशोक गवळी व किशोर सांगळे यांनी वारंवार संपर्क साधला असल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदारांच्या तक्रार अर्जामध्ये सहायक पोलीस निरीक्षक राहुल गिरमकर यांचे आर्थिक व्यवहार (वसुली) पोलीस नाईक किशोर सांगळे पाहात असल्याचे नमूद केले. यामुळे कर्तव्यात बेजबाबदारपणा, बेशिस्त, संशयास्पद सचोटी, कर्तव्यपारायणता आणि बेफिकीरपणाचे वर्तन केल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे.