अन्न सुरक्षा मानकांचे सातत्याने उल्लंघन हॉटेल्स चालकांकडून 

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू
प्रशासनाचा कारवाईचा धडाका
गुरूनाथ जाधव

सातारा – सातारा जिल्ह्यात अन्न सुरक्षा मानके व शेड्युल 4 चे हॉटेल्स चालक, मालकांकडून सातत्याने उल्लंघन केले जात असल्याचे अन्न औषध प्रशासनाच्या कारवायांवरून निदर्शनास येत आहे. हॉटेल्स चालकांच्या बेपर्वाईमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये जिल्ह्यात अनेक हॉटेल्सवरती अन्न सुरक्षा मानके व शेड्युल 4 चे उल्लंघन केल्याप्रकरणी परवाने निलंबनाच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. तरी देखील सातारा जिल्ह्यात अन्न सुरक्षा मानक शेड्युल 4 अंतर्गत येणाऱ्या महत्वाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

दोन दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यातील 16 हॉटेल्सचे परवाने निलंबित करून कारवाया केल्या असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन सातारा शिवकुमार कोडगिरे यांनी दै. प्रभातला दिली आहे. ते म्हणाले, अन्न व औषध प्रशासन, म. रा. सातारा कार्यालयाने सातारा जिल्ह्यातील हॉटेलची तपासणी केली यामध्ये प्रामुख्याने कामगारांना प्रोन व हॅडग्लोज नसणे, किचनमध्ये स्वच्छता नाही, पेस्ट कंट्रोल रेकॉर्ड ठेवले नाही, कामगारांची वैद्यकीय तपासणी नाही, खिडक्‍यांना बारीक जाळी नाही, छताला जाळी जळमटे आढळल्यामुळे, अन्न अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन केल्याने आस्थापनाविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल्सचे परवाने एक ते दहा दिवस कालावधी करता निलंबित करण्यात आले आहेत. निलंबित कालावधीमध्ये अन्न पदार्थाचे उत्पादनसाठा व विक्री केल्याचे आढळून आल्यास सदर हॉटेल्सवर आस्थापनेविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यातील 16 हॉटेल्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये हॉटेल सागर, मु. पो. मलकापूर ता. कराड जि. सातारा, एसटी कॅन्टीन, मु. पो. अतित सातारा, हॉटेल अलंकार शनिवार पेठ, ता. कराड, हॉटेल आम्रपाली, गणपती आळी, ता. वाई, हॉटेल सह्याद्री गार्डन पाचवड, ता. वाई, इल प्लाझा हॉटेल, पाचगणी ता. महाबळेश्‍वर, हॉटेल जीत पॅराईज ऍण्ड परमीट रूम. ता. फलटण, हॉटेल संजीव, फरांदवाडी ता. फलटण, हॉटेल स्वामी समर्थ एसटी स्टॅण्ड समोर ता. फलटण, मानस हॉटेल मु. पो. वाढे सातारा, हॉटेल महेंद्र एक्‍झीक्‍युटीव्ह खेड, सातारा, हॉटेल साईश, मु. पो. पुसेगाव., व्ही. के. रिझॉर्ट ऍण्ड हॉटेल, मु. पो. म्हसवड, हॉटेल अम्बॅसॅडर सदरबझार, बैठक फॅमिली रेस्टो वाढे फाटा सातारा, हॉटेल मराठा पॅलेस कोडोली सातारा या हॉटेल्सवर परवाना निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे.
वरील कारवाई सुरेश देशमुख, सहआयुक्त अन्न औषध प्रशासन पुणे विभाग, सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन सातारा शिवकुमार कोडगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रोहन शहा, श्रीमती रूपाली खापणे, अनिल पवार, श्रीमती अस्मिता गायकवाड, विकास सोनवणे यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.