वाहतुकीचे नियम धाब्यावर

कामशेत  – मावळच्या ग्रामीण भागातून मुरूम व मातीचे उत्खनन करून शहरी भागाकडे आणली जात आहे. तसेच, वाहतूक करताना वाहतुकीचे नियम डावलून ट्रक मध्ये अतिरिक्त माती, मुरूम व खडी भरली जात आहे. ही वाहने रस्त्यावरून जाताना माती, मुरुम सांडत आणि वाऱ्यावर उडवत जातात. यामुळे इतर वाहनचालक व पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मावळच्या ग्रामीण भागातून माती व मुरूमाची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. येथून माती आणि मुरुम शहरी भागांकडे नेला जातो. जास्तीत जास्त माल नेण्याच्या हव्यासापोटी ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माती व मुरुम भरला जातो. बहुतेक ट्रकमध्ये खूप वरपर्यंत माती आणि मुरुम रचला जातो. क्षमतेपेक्षा भरल्याने माती रस्त्यावरती पडत असते. तसेच हे ट्रक वेगाने जात असल्याने मोठ्या प्रमाणात माती आणि मुरुम उडत असतो. जिथून ही हे ट्रक जातात, तेथील स्थानिकांना आणि वाहनचालकांना डोळे चोळावे लागतात. यामुळे, दुचाकी चालक घसरुन अपघाताची शक्‍यता निर्माण होत आहे.

मावळ तालुक्‍यातील खेडगावांमधील रस्ते अरुंद असल्याने मुरुमांनी भरलेल्या ट्रकच्या वाहनांना ओव्हरटेक करणे इतर वाहनांना शक्‍य होत नाही. अशा वेळी इतरांना ट्रकच्या मागे चालताना माती झेलत प्रवास करावा लागतो. महामार्गावरूनही अशी अतिरिक्त माती ट्रक मध्ये भरून जात असल्याने शहरी भागात देखील ही समस्या निर्माण झाली आहे. नियमानुसार माती, मुरूम, खडी व वाळू वाहतूक करताना त्यावर झाकण टाकणे बंधनकारक आहे. परंतु, वाहतुकीचे नियमांना न जुमानता मावळमध्ये हा प्रकार सरार्सपणे चालू आहे. या वाहनांना आळा बसण्यासाठी पोलीस यंत्रणा व आरटीओ चे अधिकारी याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.