भाविकांची गैरसाय टाळण्यासाठी ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय
शिद्रुकवाडीचा पर्याय..
यात्रेसाठी भाविकांना पाठरवाडी डोंगरावर जाण्यासाठी पुर्वीचा मारुल आणि ढेबेवाडी बाजूकडील शिद्रुकवाडीचा मार्ग आहे. त्यामुळे ज्या भाविकांना दरवर्षीप्रमाणे चारचाकी व साहित्य घेऊन जायचे असेल, त्यांनी शिद्रुकवाडीवरून पाठरवाडी डोंगरावर जावे, असेही आवाहन पाठरवाडी, गमेवाडीतील ग्रामस्थांनी केले आहे.
कराड – तांबवे परिसरासह सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पाठरवाडी (ता. कराड) येथील भैरवनाथ देवाची यात्रा सोमवारी (दि. 8) साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर तसेच गमेवाडी-पाठरवाडी रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून हा रस्ता रविवारी आणि सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय तांबवे परिसरातील ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला.
तांबवे गावच्या पश्चिमेस पाठरवाडी डोंगरावर तांबवे विभागासह सातारा, सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या भैरवनाथ देवाचे मंदीर आहे. दरवर्षी चैत्र पाडव्यानंतरच्या तिसऱ्या दिवशी पहाटे भैरवनाथ देवाची यात्रा भरते. यात्रेला हजारो भाविकांची उपस्थिती असते.
भाविकासह ग्रामस्थांच्या सोयीसाठी गमेवाडी-पाठरवाडी दरम्यानच्या रस्त्याचे काम लोकवर्गणीतून सुरू आहे. मात्र, काम अपूर्ण असल्याने रविवारी आणि सोमवारी रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय तांबवे विभागातील ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे भाविकांनी अतिउत्साहीपणे वाहने नेऊ नये, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.