बेंगळुरू :- कर्नाटकातील भाजप सरकारच्या काळात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या बिटकॉइन घोटाळ्याच्या प्रकरणाची नव्याने तपासणी केली जाईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी दिली आहे.
भाजप सरकारच्या काळात सन 2021 मध्ये हे प्रकरण चर्चेला आले होते. या प्रकरणात मोठ्या नावांचा समावेश असल्याने ते झाकण्याचा प्रयत्न बोम्माई सरकारने केल्याचा आरोप कॉंग्रेसने तेव्हा विधानसभेत केला होता.
गृहमंत्री परमेश्वरा म्हणाले की, आता आम्ही सरकारमध्ये आहोत, आणि आता आम्ही या गोष्टी उघडत आहोत. मी बिटकॉइन प्रकरणाची पुनर्तपासणी करत आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुख्य संशयित, श्रीकृष्ण रमेश उर्फ श्रीकी, याच्यावर राज्य सरकारची ई-प्रोक्योरमेंट साइट हॅक करून 11.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर क्रिप्टोकरन्सी चोरी, ड्रग्ज पेडलिंग आणि सायबर फसवणुकीचे आरोप देखील होते.
पोलिस उपनिरीक्षक भरती घोटाळ्याबाबत गृहमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि प्रकरण न्यायालयातही आहे. उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करेल. या संबंधात आपण ऍडव्होकेट जनरल आणि पोलिस महासंचालकांशी बोलत आहोत असे त्यांनी सांगितले.