‘काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा…; भाजपच्या ‘या’ नेत्याची सडकून टीका

नवी दिल्ली : देशात भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाद हा काही नवीन नाही. रोज कोणत्या ना कोणत्या  कारणावरून दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करताना दिसतात. त्यात आता पुन्हा एकदा भाजपने काँग्रेसवर टीका करत पक्षाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

‘काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा’ असल्याचे म्हणत भाजपा नेते आणि प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर गांधी परिवाराच्या नेतृत्वावरही त्यांनी टीका केली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या चर्चेमध्ये ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

“एखाद्या पक्षाची ओळख म्हणजे त्याची विचारधारा आणि नेतृत्व असतं. भारतीय जनता पार्टीची विचारधारा स्पष्ट आहे आणि आमचं नेतृत्व म्हणजे मोदीजी देशातच नव्हे तर जगभरातलं सर्वात खंबीर नेतृत्व आहे. पण दुसऱ्या बाजूला बघितलं तर काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा आहे. तो बुडतच चालला आहे. बुडणार तर आहेच तो कारण राहुल गांधींच्या परिवाराव्यतिरिक्त जर कोणी उठून दिसू लागला तर त्याला दाबून टाकलं जातं, त्याला बाजूला केलं जातं. म्हणून पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह विरुद्ध नवज्योत सिंह सिद्धू, राजस्थानात अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट आणि समाजवादी पार्टी तर एकाच परिवारातल्या सदस्यांनी तयार झालेली आहे. अध्यक्षही त्याच परिवारातील आहेत” असं म्हटलं आहे.

गौरव भाटिया यांनी “मुकुल रॉय यांच्याबद्दल मी म्हणेन की येथेही फरक आपल्याला दिसून येतो. जेव्हा जितिन प्रसाद काँग्रेस सोडून जातात तेव्हा मध्यप्रदेशातली काँग्रेसची शाखा म्हणते की, तो कचरा होता, कचरापेटीत गेला. पण जेव्हा मुकुल रॉय सोडून गेले, तेव्हा आम्ही अशा प्रकारचं कोणतंही विधान केलं नाही” असे देखील म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.